*कोकण Express*
*दर्पण प्रबोधिनी संघटनेतर्फे बुद्धविहार परिसरात जयभीम 2022 महोत्सव साजरा*
*दर्पण प्रबोधिनी संघटनेचा जयभीम महोत्सव म्हणजे विचारवंतांचा मेळावा:भीमराव पांचाळे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजसुधारकांचे विचार पुढे नेण्याचे कामे दर्पण प्रबोधिनी संघटना करीत आहेत. संघटनेचे हे कार्य अतुनीलय असून दर्पण प्रबोधिनी संघटनेने आयोजित केलेला जयभीम महोत्सव म्हणजे विचारवंतांचा मेळावा असून दर्पण प्रबोधिनीने यापुढील काळात सामाजिक व्यवस्थेत समानता प्रस्थापित होण्याचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन सुप्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे यांनी केले. दर्पण प्रबोधिनी संघटनेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या जन्मस्मरण दिनानिमित्त संघटनेतर्फे येथील बुद्धविहार परिसरात जयभीम 2022 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. पांचाळे बोलत होते. यावेळी विचारपीठावर दर्पण प्रबोधिनी संघटनेचे अध्यक्ष तथा निवेदक राजेश कदम, जयभीम महोत्सवाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य सिद्धार्थ तांबे, सत्यशोधक युवा समाजप्रबोधनकार रोशन पाटील, हास्यसम्राट कुणाल मेश्राम, अनिल श्यामराव तांबे, नीलम पवार, रवींद्र पवार, भास्कर तांबे, सामाजिक कार्यकर्ते तथा चित्रकार नामनंद मोडक, समाजभूषण संदीप कदम, महाराष्ट्र राज्य प्राथिमक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम, प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ. सोमनाथ कदम, संगम कदम, डॉ. अशोक कदम, रचना तांबे, डॉ. सिद्धार्थ तांबे, डॉ. व्ही.जी.कदम, डॉ., संतोष तांबे, सुधीर तांबे, नरेंद्र तांबे, श्रीधर तांबे, नेहा कदम, स्नेहल तांबे, सुनील तांबे, किशोर कदम, महेंद्र कदम,पी.जी.कदम, विशाल हडकर यांच्यासह संस्थेचे सल्लागार व सदस्य उपस्थित होते. रोशन पाटील म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष हा खरा समाजप्रबोधनाचा मार्ग असून सामाजिक चळवळींमध्ये काम करणार्यांनी हा मार्ग स्वीकारला पाहिजे.
सामाजिक चळवळीची भाषा करणे खूप सोपे असते, परंतु चळवळ पुढे नेण्याचे काम खूप कठीण आहे. आजच्या आधुनिक समाजामध्ये लोकांच्या मानसिकतेत अमुलाग्रह बदल झाला असून समाजप्रबोधनाच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा मनोरंजनाचे कार्यक्रम अधिक प्रिय वाटत आहेत, ही एक मोठी शोकांतिका आहे. यावेळी राजेंद्र मुंबरकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून दर्पण प्रबोधिनी संघटनेच्या जयभीम महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, विद्रोही कवी तथा दर्पण संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक आनंद तांबे यांनी केले. सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. आभार अनिल तांबे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागिरक उपस्थित होते. जयभीम महोत्सवात दर्पण प्रबोधिनी संघटनेच्या महिला फ्रंटच्या सदस्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई यांच्या जीवनप्रवासावर आधारित नृत्यविष्कार, नाटिका, गाणी सादर करीत समाजप्रबोधन केले.
तसेच भीमजल्लोष -2022 या सांगीतिक कार्यक्रमात स्टार प्रवाह छोटे उत्साद फेम पृथ्वी तांबे, स्मिता कदम, प्रा. सिद्धार्थ कदम, सुदिन तांबे, दिनेश हेलोडे, सारेगम फेम प्रीतम बावडेकर, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मेश्राम या कलाकारांनी क्रांतिकारी गिते व शाहिर जलसा सादर करत रसिकांना खिळवून ठेवत समाजप्रबोधन केले. तर ईशिका डान्स ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी दाद दिली. .