मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेसाठी निलेश राणेंकडून २ लाखाची मदत

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेसाठी निलेश राणेंकडून २ लाखाची मदत

*कोकण Express*

*मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेसाठी निलेश राणेंकडून २ लाखाची मदत*

*मालवण  ः प्रतिनिधी*

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेतील व्यायामाचे साहित्य खराब झाल्याने साहित्य दुरुस्ती व खरेदीसाठी भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून २ लाख रुपयांची मदत करण्यात आली. ज्येष्ठ उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या हस्ते ही मदत व्यायाम शाळा चालविणाऱ्या तरुणांकडे सुपूर्द करण्यात आली. यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. मालवण भाजप कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात व्यायामशाळेसाठी निलेश राणे यांनी दिलेली ही मदत सुपूर्द करण्यात आली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आपा लुडबे, जगदीश गावकर, विजय केनवडेकर, विक्रांत नाईक, राजू बिडये, ललित चव्हाण, पंकज पेडणेकर, यांच्यासह व्यायाम शाळेचे प्रवीण हिंदळेकर, स्वप्नील मालवणकर, प्रसाद माडये, प्रशांत पाटकर, जॉन फर्नांडिस, अवि आचरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, गेल्या दोन वर्षात मालवण नगरपालिकेची व्यायामशाळा कोरोना महामारीमुळे तसेच त्याठिकाणी कोविड सेंटर सुरू केल्याने बंद राहिल्याने तेथील व्यायामाचे साहित्य गंज चढल्याने खराब झाले आहे. हे साहित्य दुरुस्ती करून मिळावे तसेच काही साहित्य नव्याने खरेदी करावे अशी मागणी व्यायामशाळा चालविणाऱ्या तरुणांकडून करण्यात येत होती. याबाबत मालवण नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेकडून व्यायामशाळेसाठी २५ लाख मंजूर केले असल्याचे पत्र या तरुणांना दिले.

मात्र प्रत्यक्षात पत्र देण्यापलिकडे कोणताच निधी दिला गेला नाही, अशी टीका आचरेकर यांनी केली. खराब व अपुऱ्या साहित्यामुळे व्यायामशाळा चालविणे मुश्किल होत असल्याने या तरुणांनी आपल्याकडे धाव घेतली असता आपण व भाजप पदाधिकाऱ्यांनी निलेश राणे यांच्याकडे या तरुणांची व्यथा मांडली असता मालवणातील तरुणांच्या शारीरिक आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन निलेश राणे यांनी २ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. जे काम नगरपालिका सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या आमदार, खासदार यांना जमले नाही ते काम निलेश राणे यांनी केले आहे. या निधीमुळे व्यायामाचे साहित्य दुरुस्ती करणे सुलभ होणार आहे, असेही आचरेकर म्हणाले. तसेच येत्या मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यावर व्यायामशाळेसाठी भरघोस असा निधी दिला जाईल असे आश्वासनही आचरेकर यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!