*कोकण Express*
*लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर*
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आज रविवारी सकाळी ८.१२ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९२ वर्षाच्या होत्या. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असतं. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.
कोण घेतं निर्णय?
केंद्र पातळीवर केंद्रीय गहमंत्रालय यासंदर्भातील निर्देश जारी करते. राज्यही त्यांच्या प्रदेशात शासकीय दुखवटा जाहीर करु शकतात. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि दुखवटा जाहीर करण्यासाठी संबिधित निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात.
राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यानंतर…
– ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतो.
– राष्ट्रध्वज किती दिवस या स्थितीत राहील याचा निर्णय फक्त राष्ट्रपती घेतात.
– सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते.
– शासकीय सन्मान प्राप्त व्यक्तीचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळण्यात येते.
– अंत्यसंस्कारावेळी बंदुकांची सलामी देण्यात येते.