आ.नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

आ.नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

*कोकण  Express*

*आ.नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला!*

*तर दहा दिवसात शरण येण्याचे आदेश!*

*नवी दिल्ली:* 

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणेंना येत्या दहा दिवसात शरण येण्यास सांगितले आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे. येत्या दहा दिवसांसाठी नितेश राणे यांना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे आता कनिष्ठ कोर्टात नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच नितेश राणेंवरील आरोप खोटे असून राजकीय सुडापोटी करण्यात आलेले हे आरोप असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचा राणेंच्या वकिलांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांच्या समोर नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीनं मुकूल रोहतगी तर राज्य सरकारच्यावतीनं अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. कोर्टात दोन्ही बाजूनं जोरादर युक्तिवाद करण्यात आला.

कनिष्ठ न्यायालयात अर्ज करावा लागणार

पुढच्या दहा दिवसात नितेश राणे यांनी नियमित जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा आहे. त्याकरता दहा दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे, असं राणेंचे वकील देसाई यांनी सांगितलं. पण कोर्टाने ऑर्डरपास करून त्यांना नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे, असं देसाई म्हणाले.

अटकपूर्व जामीन आणि रेग्युलर जामिनात फरक

अटकपूर्व जामीन म्हणजे अटक होण्याच्या अगोदर किंवा अटक झाल्या झाल्या सीआरपीसी 438 नुसार अर्ज करता येतो. रेग्युलर जामीन म्हणजे अटक झाल्यानंतरचा जामीन असतो. त्यामुळे सेशन कोर्टात जाऊन आम्हाला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा लागेल. फरक फक्त एवढाच की आम्ही स्वत:हून गेलो असलो तरी आम्हाला अटक झालेली नसेल. आम्ही पोलिसांच्या कस्टडीत नसू. त्यामुळे आम्हाला दहा दिवसांचं संरक्षण आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राणेंवरील आरोप खोटे

नितेश यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. राजकीय कारणासाठी खोडसाळ कारणे देऊन त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा युक्तिवाद आम्ही केला. तर नितेश राणेंची अजून चौकशी करायची आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. गोट्या सावंतचा अर्ज अजून कोर्टात सुनावणीसाठी आला नाही. उद्या कदाचित येईल. मनिष दळवींना जामीन मिळालेला आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!