*कोकण Express*
*पत्रकारांचा विमा, निबंध स्पर्धा आणि स्वच्छता अभियान कणकवली तालुका पत्रकार संघाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत पत्रकारांचा विमा उतरवणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे, वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत, अधिकार्यांसमवेत वार्तालापचा कार्यक्रम घेणे या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच 23 डिसेंबरला सकाळी 8 वाजता तहसीलदार कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे सर्वानुमेत ठरविण्यात आले.
कणकवली तालुका पत्रकार संघाची बैठक तेलीआळी भवानी सभागृहात अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडली. या बैठकीला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, संतोष वायंगणकर, वीरेंद्र चिंदरकर, तुषार सावंत, लक्ष्मीकांत भावे, भगवान लोके, राजन चव्हाण, चंद्रशेखर तांबट, तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य भास्कर रासम, उत्तम सावंत, तुळशीदास कुडतरकर व स्वप्नील वरवडेकर, तुषार हजारे, विशाल गुरव, पंढरीनाथ गुरव, विराज गोसावी, गुरुप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील पत्रकारांचा विमा उतरविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. विमा उतरविण्यासाठी 13 सदस्यांनी आपली नावे नोंदवली आहेत.
नतून वर्षापासून अधिकार्यांसमेवत वार्तालाप कार्यक्रम जानेवारी महिन्यापासून सुरू करण्याचे ठरविण्यात आले. तालुका पत्रकार संघातर्फे दिल्या जाणार्या पुरस्कारांसाठी 30 डिसेंबरपर्यंत नावे सूचविण्याचे आवाहन सदस्यांना करण्यात आले. ही नावे सूचविताना संबंधित व्यक्तीची थोडक्यात माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. तालुका पत्रकार संघाच्यावतीने 23 डिसेंबरला सकाळी 8 वाजता कणकवली तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. शेवटी आभार उत्तम सावंत यांनी मानले.
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, महाविद्यालयीन अशा तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले.
निबंध स्पर्धेसाठीचे विषय ः 5 वी ते 7 वी गट ः 1) मोबाईल फायदे ते तोटे, 2) बदलते पर्यावरण कारणे व उपाय, 8 वी ते 10 वी गट ः 1) ऑनलाईन शिक्षण फायदे-तोटे ? 2) कोरोना ः काय कमावले, काय गमावले, महाविद्यालयीन गट ः 1) मेक इन इंडिया (बदलता भारत), 2) मैदानी खेळ उपयुक्तता व आरोग्य यापैकी एक विषयावर तीन गटांतील स्पर्धकांनी 1000-1200 शब्दांत निबंध लिहून 2 जानेवारी 2022 पर्यंत अशोक एजन्सी, कणकवली किंवा मनीष ऑनलाईन व झेरॉक्स सेंटर (कणकवली पंचायत समिती नजीक) येथे पाठवावेत.