जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात राणे कुटुंबाचे मोठे योगदान – नासीर काझी

जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात राणे कुटुंबाचे मोठे योगदान – नासीर काझी

*कोकण Express*

*जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात राणे कुटुंबाचे मोठे योगदान – नासीर काझी…*

*कोकिसरे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…*

*वैभववाडी ः  प्रतिनिधी*

जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात राणे कुटुंबाचे फार मोठे योगदान आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सातत्यपूर्ण केले आहे. शासनाच्या कोणत्याही निधीची वाट न बघता या मतदार संघाचे पालक आ. नितेश राणे यांनी सर्व शाळा डिजिटल केल्या आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत. मात्र उचित ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेणे फार महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन वैभववाडी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी व्यक्त केले.

कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोकिसरे सरपंच दत्‍ताराम सावंत व उपसरपंच वसुधा आम्रसकर यांच्या माध्यमातून येथील माधवराव पवार विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम पार पडला. 23 जून रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून सदर कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

कार्यक्रम प्रसंगी सभापती अक्षता डाफळे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, सरपंच दत्‍ताराम सावंत, ग्रा.पं. सदस्य प्रदीप नारकर, अनंत नेवरेकर, प्रमोद जाधव, दाजी पाटणकर, रमेश शेळके, नंदकुमार आम्रसकर, मुख्याध्यापक विनोद गोखले व पदाधिकारी उपस्थित होते. सौ. अक्षता डाफळे म्हणाल्या, कोरोनात अनेक अडचणी असताना देखील विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते अतूट राहिले आहे. शिक्षकांनी या संकट काळात केलेले काम, दिलेले योगदान ग्रामस्थ कधीही विसरणार नाही. यापुढे देखील शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यात चांगला समन्वय राहिला पाहिजे.

सुधीर नकाशे म्हणाले, ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास घडविला आहे. या आदर्श खेळाडूंची कामगिरी प्रत्येक विद्यार्थ्याने डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही पहिल्यांदा सुज्ञ नागरिक बनली पाहिजे. त्याचबरोबर देशाची मान उंचावेल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सांगितले. यावेळी विद्यालयातील 650 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद गोखले यांनी केले. तर आभार नंदकुमार आम्रसकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!