चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे
चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा शुभारंभ सोहळा

*कोंकण एक्सप्रेस
*चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट आणि तलाठी कार्यालय सुरु झाल्याने गावाची विकासाकडे झेप ; सभापती गणेश राणे
*चाफेड गावात स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालयाचा शुभारंभ सोहळा
*शिरगांव : संतोष साळसकर
चाफेड गावच्या सुसज्य अशा ग्रामपंचायतीमध्ये आता स्वतंत्र पोस्ट कार्यालय आणि तलाठी कार्यालय सुरू झाल्यामुळे गाव विकासाकडे झेपावत आहे. भविष्यात ग्रामस्थांच्या मागणीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या गावात पशुवैद्यकीय दवाखाना आणि आरोग्य उपकेंद्र व्हावे यासाठी आमचे नक्की प्रयत्न असतील. असे सांगत भविष्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावात जास्तीत जास्त बंधारे बांधल्यास भूजल पातळीत नक्कीच वाढ होईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे जोरदार प्रयत्न असल्याचे देवगड पं. स. सभापती गणेश राणे यांनी बोलताना सांगितले.
देवगड तालुक्यातील चाफेड गावचे पोस्ट कार्यालय गेली 63 वर्ष आयनल गावात सुरू होते. मात्र चाफेड ग्रामस्थांच्या गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार आता हे पोस्ट कार्यालय चाफेड ग्रामपंचायत मध्ये स्वतंत्र कार्यरत झाले. त्याच्या शुभारंभ प्रसंगी सभापती बोलत होते. या पोस्ट कार्यालयाचे उदघाटन सभापती गणेश राणे तर तलाठी कार्यालयाचे उदघाटन भाजपचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सभापती गणेश राणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनेचे सह अध्यक्ष संदीप साटम, सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, जिल्हा डाक निरीक्षक श्रीराम वायाळ, माजी जि. प. सदस्य सुभाष नार्वेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा माजी सरपंच सत्यवान भोगले, तलाठी अनंत अंधारी, माजी सरपंच आकाश राणे, संतोष साळसकर, दिपाली घाडी, ग्रा. स. सुनील कांढर, सौ. मानसी परब, सुदर्शन साळकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय परब, प्रवीण राणे, नूतन पोस्ट मास्तर शरयू मुरुडकर, आय.पी. पी. ए. निलेश ठाकूर, डाक आवेक्षक संदीप चव्हाण, एम. एम. आरलेकर, आयनल पोस्टमास्तर आनंद साटम, पोस्टमन सुनील घाडी, ग्रामपंचायत अधिकारी प्रथमेश देशमुख, साळशी चे माजी सरपंच वैभव साळसकर आदीसह अनेक मान्यवर उपस्तित होते.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम म्हणाले की, पोस्टाच्या व्यवहारात विश्वासाहर्ता असून बँकांचे सर्व व्यवहार आता पोस्टात होतात. त्यामुळे ग्रामीण जनतेला याचा नक्कीच फायदा होणार आहे. मात्र यात संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्यपणा ठेवला तरच जनतेचा विश्वास अजून वाढेल. आज पर्यंत हा गाव पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठीशी खंबीर राहिल्यामुळे या गावचा विकास होत आहे. भविष्यात चाफेड ते साळशी आणि पिंपळवाडी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण, पशुवैद्यकीय दवाखाना आणि आरोग्य उपकेंद्र ही कामे नक्कीच पूर्ण होतील. आपण सर्वांनी अशीच एकजूट आणि एकसंघपणा कायम ठेवा असे सांगितले.
डाक निरीक्षक श्रीराम वायाळ म्हणाले की, पोस्ट कार्यालय सेवा इंग्रज काळात सुरू झाली. आज संपूर्ण भारतात सुमारे 1 लाख 65 हजार पोस्ट कार्यालय सुरू आहेत. डाक सेवा ही पूर्णपणे विश्वासू सेवा आहे. आजच्या या नूतन पोस्ट कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी 500 ग्राहकानी आपली खाती उघडली याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले. तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यवान भोगले यांनी आपल्या मनोगतात या स्वतंत्र पोस्ट कार्यालयासाठी माजी सरपंच कै. किरण मेस्त्री यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गावच्या इतिहासात सुवर्णक्षनांनी लिहावा असा हा योग आहे. भविष्यात या गावात पशुवैद्यकीय दवाखाना आणि आरोग्य उपकेंद्र व्हावे अशी मागणी करत त्यासाठी गावात विनामूल्य जागा दिली जाईल. असे सांगितले. पोस्टमन सुनील घाडी यांच्या सेवेबद्दल विशेष गौरोवोदगार काढले. यावेळी सरपंच साहिल पांचाळ आणि तलाठी अनंत अंधारी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी विविध मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . आयनल गावचे पोस्ट मास्तर आनंद साटम, पोस्टमन सुनील घाडी यांनी आज पर्यंत चाफेड गावासाठी निस्वार्थीपणे चांगली सेवा दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक साटम तर आभार प्रदर्शन विजय परब यांनी मांडले.
जाहिरात


