*कोकण Express*
*शेर्लेत पुरासोबत वाहून आली आठ फुटी मगर…!*
*पुरस्थिती कायम असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण*
*बांदा ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात गेले चार पाच दिवस तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदीचे पाणी लोकवस्तीत आणि शेतात घुसल्याच्या घटना समोर येत आहेत. तेरेखोल येथेही अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला आणि नदीचे पाणी शेर्ले गावात शिरले. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरेखोल नदीतील तब्बल आठ ते नऊ फुटी मगरही शेर्ले परिसरात वाहत आली. ग्रामस्थांच्या ती नजरेस पडताच अनेकांची भीतीने धांदल उडाली. अखेर मनोज बांदेकर, लक्ष्मीकांत बेळगावकर, तुषार बांदेकर आदींच्या प्रयत्नामुळे मगरीला जेरबंद करणे शक्य झाले. मगरीला पकडून बांदा बाजारपेठेतील वनविभाग कार्यालयाकडे तिला सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, मगरीला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. परिसरात अनेक ठिकाणी अजूनही पुराचे पाणी कायम असल्याने त्या ठिकाणीही प्रवाहासोबत आलेल्या मगरी असण्याची शंका ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.