*कोकण Express*
*ठाकरे दाम्पत्याकडून विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा*
*पंढरपूर :*
आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी मानाचा वारकरी म्हणून शासकीय महापूजेस उपस्थित राहण्याचा मान केशव शिवदास कोलते (वय ७१) व इंदूबाई केशव कोलते (वय ६६, दोघे रा. संत तुकाराम मठ, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, जि. वर्धा) या दांपत्यास मिळाला.
पूजेनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मंदिराच्या बाजीराव पडसाळी परिसरात कान्होपात्र ( तरटी) झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, कार्यकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व अन्य सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
फुलांची आरास
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बाजीराव पडसाळी, विठ्ठल सभामंडप, चौखांबी, सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेचा गाभारा, श्री संत नामदेव पायरी जवळ श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे.