*कोकण Express*
*मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसीसची प्रतिक्षा संपली*
मालवण दि प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयातील डायलिसीस सेंटरचं गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. मागील अनेक महिन्यांपासून या डायलिसिस सेंटरची नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर हे काम पूर्णत्वास गेल्यानंतर याचा औपचारिक लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मंगळवारी आणि शुक्रवारी आठवड्यातून दोन दिवस याठिकाणी रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे. दर दिवशी ४ रुग्णांवर डायलिसिस होणार असल्याचे यावेळी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. दरम्यान, येथील डिजिटल एक्स रे मशीनचं देखील यावेळी लोकार्पण करण्यात आलं. मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलिसीस सुविधा उपलब्धं नसल्याने संबंधित रुग्णांना उपचारासाठी कुडाळ, कणकवली अथवा पडवे येथील खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारातून मालवण ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे येथील डायलिसिस युनिट सुरू होऊ शकले नव्हते. अखेर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर येथील डायलिसिस युनिटचे गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात डिजिटल एक्स-रे मशीनही बसविण्यात आली असून या मशीनचे लोकार्पण देखील यावेळी संपन्न झाले. त्यावेळी तंत्रज्ञ चंद्रशेखर केळुसकर यांनी डिजिटल एक्स-रे साठी फिल्म प्रिंटर आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर महिन्याभरात हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. यावेळी डॉ. बालाजी पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, तालूकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, प्रसाद आडवलकर, गणेश कुडाळकर यांच्यासह अन्य डॉक्टर, कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते डायलिसिस युनिटचे काम करणाऱ्या ठेकेदार उमेश मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला.