बावशी रेशनिंग दुकान प्रकरणाला अजून एक वळण

बावशी रेशनिंग दुकान प्रकरणाला अजून एक वळण

*कोकण Express*

*बावशी रेशनिंग दुकान प्रकरणाला अजून एक वळण*

*ग्रामस्थांनी दिला २६ जुलै रोजी आमरण उपोषणाचा इशारा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील बावशी जय मल्हार स्वयं. सहायता महिला बचत गटाला रेशनिंग दुकानाची मान्यता द्यायला दिवसेंदिवस विरोधच होत असून आता या विरोधात थेट प्रांताधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांमार्फत देण्यात आले आहे. जय मल्हार स्वयं. सहायता महिला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ दिल्यास ग्रामस्थांसोबत ग्रामपंचायत सदस्य मनश्री कांडर यांनी २६ जुलै रोजी बावशी ग्रा‌. पं. येथे उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आपल्या निवेदनातून उपविभागीय अधिकारी कणकवली यांना दिला आहे.

बावशी गावाच्या स्वतंत्र रेशनिंग दुकानासाठी गेल्या वर्षी जय मल्हार महीला बचत गटाने जिल्हा पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र कोरोनाच्या काळात बचत गटाचा पुरवठा विभागाशी संपर्क न झाल्याने कालांतराने प्रस्ताव रद्द करण्यात आला. यामुळे बचत गटामार्फत पुरवठा विभागाच्या विरोधात आमरण उपोषण छेडण्यात आले होते. यानंतर नायब तहसीलदार सुजाता पाटील यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले होते. परंतु सदर रेशनिंग दुकान आहे त्याच ठिकाणी चालू रहावे, अशी बावशी शेळीचीवाडी, गावठणवाडी आणि बौद्धवाडी यांची मागणी असून सदर गटाला मुदतवाढ देण्यात येवू नये. याबाबत लेखी स्वरुपात कळविण्यात यावे. अन्यथा बावशी ग्रामस्थ २६ जुलै रोजी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

नांदगाव वि. वि. कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून तोंडवली बावशी फाटा येथे चार महिन्यांपूर्वी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या हस्तृ रेशनिंग दुकान सुरू झाले आहे. हे रेशनिंग दुकान सर्वांना सोईचे आहे. जर ते येथून हलविण्याचा प्रयत्न केला, तर २६ जुलै रोजी सारे रेशनिंग कार्ड धारक आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी निवेदन पालकमंत्री व प्रांताधिकारी यांचेकडे सादर करण्यात आले आहे.

रेशनिंग दुकानासाठी दुसरी जागा दाखविण्यासाठी पुरवठा विभागाने पत्रव्यवहार केला होता. परंतु कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने बचत गटाच्या महिला कोरोना बाधीत होत्या. यामुळे पुरवठा विभागाशी संपर्क होऊ शकला नाही आणि पुरवठा विभागाने आमचा रेशनिंग दुकान प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. या विरोधात आम्ही तोंडवली बावशी ग्रामपंचायतीच्या आवारात जिल्हा पुरवठा विभागाच्या विरोधात आमरण उपोषण केल्याचे बचत गटाच्या प्रमुख स्नेहलता कांडर व इतर महीलांनी बोलताना सांगितले आहे.

आता या रेशनिंग दुकानाबाबत काय निर्णय होतो, तसेच आता सुरु असलेल्या जागेवर रेशनिंग दुकान राहते की दुसरीकडे हलविण्यात येते, याबाबतच्या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!