कुडाळ महिला रुग्णालय येथील नवीन ऑक्सिजन प्लांटच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

कुडाळ महिला रुग्णालय येथील नवीन ऑक्सिजन प्लांटच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

*कोकण Express*

*कुडाळ महिला रुग्णालय येथील नवीन ऑक्सिजन प्लांटच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी*

*कुडाळ  ः प्रतिनिधी*

कुडाळ महिला बाल रुग्णालय कोविड सेंटर येथे ६ हजार लिटर क्षमता असलेला नवीन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येत असून त्याचे काम गतीने सुरु आहे.आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
कुडाळ महिला बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये लागणारे ऑक्सिजन सिलेंडर बाहेरून रिफिल करुन आणावे लागत आहेत.यासाठी अधिक वेळ लागत आहे.त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या प्रयत्नांतून रुग्णालय परिसरातच ६ हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात येत आहे.
या ऑक्सिजन प्लांटचा टॅंक बसविण्यात आला आहे. यानंतर आता रुग्णांच्या बेडपर्यंत थेट ऑक्सिजन वाहून नेणारी आतील यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात हे महिला बाल रुग्णालय स्वयंपूर्ण होणार आहे.
त्याचप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे महिला व बाल रुग्णालयात पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबतचा डीडीओ कोड वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या नावे काढण्यात आला आहे. लवकरच या रुग्णालयात पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद वालावलकर, युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, मंजुनाथ फडके, यांसह अधिपरिचारिक उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!