शिवसेना खासदारांचे टोल वसुली ला प्राधान्य ; कणकवलीतील हायवेच्या समस्यांकडे दुर्लक्ष

शिवसेना खासदारांचे टोल वसुली ला प्राधान्य ; कणकवलीतील हायवेच्या समस्यांकडे दुर्लक्ष

*कोकण Express*

*शिवसेना खासदारांचे टोल वसुली ला प्राधान्य ; कणकवलीतील हायवेच्या समस्यांकडे दुर्लक्ष*

 

*नगरसेवक शिशिर परुळेकर*

*कणकवली ः (संंजना हळदिवे)*

नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी नगरपंचायत वर आरोप करण्यापूर्वी कणकवलीत गोकुळधाम कडील नाल्यात पाणी साचले त्याची कारणे आपल्या नेत्यांनाच विचारावित. गेल्या तीन वर्षात अनेक वेळा रुपेश नार्वेकर यांचे पद नसलेले नेते संदेश पारकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी या नाल्याची वारंवार पाहणी केली. त्यानंतर विजय भवन मध्ये हायवे ठेकेदार व महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीही झाल्या. त्या पाहणीच्या वेळचे फोटो देखील आमच्या जवळ उपलब्ध आहेत. विजय भवन मधल्या बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी ठेकेदार कंपनीला तातडीने शहरातील हायवे ची कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यातील एकही काम मार्गी लागले नाही. पण नगराध्यक्षांनी सूचना दिल्यानंतर शहरातील हायवेची काही कामे मार्गी लागली याची माहिती नार्वेकर यांनी घ्यावी.काही दिवसांपूर्वी टोल वसुली साठी खासदार विनायक राऊत यांनी कंपनी स्थापन केली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. कणकवली शहरातील लोकांच्या समस्या व हायवेचे शहरातील प्रश्न दुर्लक्ष करून खासदार विनायक राऊत यांनी आपल्या कंपनीला वसुली लवकरात लवकर करायला मिळावी याकरिताच या नाल्याच्या पाहणी नंतरही सदर काम मार्गी लावून घेतले नाही का? हा प्रश्न रुपेश नार्वेकर यांनी त्यांच्या खासदारांना विचारावा.जनतेचे प्रश्न डावलुन केवळ टोल वसुलीचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या खासदारांच्या वसुली मोहिमेकडे नार्वेकर यांचे दुर्लक्ष का? की या वसुलीत नार्वेकर यांचे एकमेव उरलेले नेते देखील सहभागी आहेत? रामेश्वर प्लाझा इमारत बांधकाम हे नैसर्गिक पाण्याचे स्रोत असलेल्या वहाळ वर स्लॅब टाकून केलेले बांधकाम आहे. त्यामुळे बिल्डर चा दोष मोठ्या प्रमाणात आहे. या कॉम्प्लेक्स च्या मागे टिकले कॉम्प्लेक्स असून तेथून नैसर्गिक पद्धतीने पाणी पुढे जात होते. तेथे नगरसेवक सुशांत नाईक यांनी वहाळ चे रूपांतर छोट्या गटारात केले. त्या मुळे दिलीप बिल्डकाँन पाणी साचण्याला जेवढी दोषी आहे तेवढाच दोष नगरसेवक सुशांत नाईक यांचा आहे. याचा जाब नार्वेकर हे नाईक यांना विचारतील काय? मुसळधार झालेल्या या पावसाने पाणी साचले याला जर रुपेश नार्वेकर नगरपंचायत ला जबाबदार धरणार असे सांगत असतील तर सावंतवाडी, मालवण, बांदा, कुडाळ या भागांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेकांचे नुकसान झाले. त्याला रुपेश नार्वेकर पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांना जबाबदार धरणार आहेत का? व त्यांच्या बाबत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार आहेत का? उदय सामंत वैभव नाईक यांचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरल्याने या भागांमध्ये पाणी साचले असे समजायचे का? त्यामुळे नार्वेकर यांनी या प्रश्नी जरी लक्ष वेधले नाही तरी आम्ही भाजपाच्या वतीने याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार आहोत. व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने पाणी साचून लोकांचे नुकसान झाले त्याला सत्ताधारी पक्षाचे जबाबदार व्यक्ती म्हणून पालकमंत्री, वैभव नाईक यांना जबाबदार धरा अशी मागणी देखील करणार आहोत. आपल्या नेत्यांनी केलेल्या घोषणा व त्यांनी घेतलेल्या बैठकी मधील आश्वासने रुपेश नार्वेकर यांनी अगोदर आठवावी. अन्यथा याप्रश्नी आम्हाला तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांचे लक्ष वेधून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणा बद्दल बैठकांना उपस्थित असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना जबाबदार धरा अशी मागणी करावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!