*कोकण Express*
*…. त्या‘सेविकांच्या’पाठीशी ‘मनसे’- अमित इब्रामपूरकर*
*जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या आशासेविकांच्या मागण्यांची शासनाने दखल घ्यावी..*
*मालवण ः प्रतिनिधी*
मागील वर्षभर कोरोना संसर्गाच्या काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आहेत.त्यांना मनसेचा पुर्ण पाठिंबा असल्याची भूमिका मनसेच्यावतीने अमित इब्रामपूरकर यांनी स्पष्ट केली आहे.
आशासेविकांना राज्य सरकारने फुटकी कवडीही कोरोनाच्या कामापोटी दिलेली नाही.केंद्र सरकारकडून कोरोना भत्ता म्हणून महिन्याला १००० रुपये म्हणजे प्रतिदिन ३५ रुपये दिले जातात.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मास्क,हातमोजे,सॅनिटाइजर आदी मिळाले.मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक ठिकाणी काहीच दिले जात नव्हते तर काही ठिकाणी अर्धवट वस्तू देत होते.आशा सेविका घरोघरी जाऊन पल्स ऑक्सिमीटर,ताप मोजण्यापासून आरोग्याच्या वेगवेगळ्या नोंदी करतात.एका आशाला किमान ५० घर रोज करावी लागतात.याशिवाय आरोग्य केंद्रावर जाऊन लसीकरणापासून रुग्ण तपासणीत मदत करावी लागते.शिवाय आरोग्य विभागाचे डॉक्टर सोपवतील ती कामे करावी लागतात.साधारणपणे ८ ते १२ तास काम करून घेतले जाते.त्याबद्दल महिन्याकाठी १००० रुपये म्हणजे रोज ३५ रुपये दिले जातात.आशांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची कोणतीच जबाबदारी सरकार घेत नाही.आशा व कुटुंबीयांना कोणतेही विमा कवच,आरोग्य संरक्षण नाही,आजारी पडल्यामुळे कामावर आले नाही तर मानधन कापले जाते.आशांना कोरोना काळात केलेल्या कामाचे किमान ५ हजार रुपये मासिक वेतन मिळाले पाहिजे.या विविध मागण्या,समस्यांसाठी जिल्ह्यातील आशासेविका संपावर गेलेल्या आहेत त्यांना मनसेचा पाठिंबा असल्याचे अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले आहे.