*कोकण Express*
*विकास कामांना प्राधान्यक्रमाने निधी देणार…!*
*मुख्यमंत्र्याची सतीश सावंत यांना ग्वाही…!*
*सतीश सावंत यांच्याशी साधला मुख्यमंत्र्यानी थेट संवाद…!*
*कणकवली:- संजना हळदिवे*
कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार असला तरी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि तुमच्या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्याने निधी दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते तथा जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत यांना दिली आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी तसेच माजी आमदार, जिल्हाप्रमुख यांची झूम मीटिंग शनिवारी रात्री झाली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेना नेते सतीश सावंत यांचाही समावेश होता. या बैठकीत विविध राजकीय स्थितीवरती चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील प्रमुख ६४ पदाधिकार्यांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. तत्पूर्वी मराठवाडा, नाशिक, कोल्हापूर आणि कोकण या विभागातील प्रमुख नेत्यांना आपली मते मांडण्याची संधी देण्यात आली. यात कोल्हापूरचे राज्य नियोजनमंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, बीड येथील जयदत्त क्षीरसागर, जालना येथील अर्जुन खोतकर, डॉ. जयप्रकाश मुंदडा, नांदेडच्या राजश्री पाटील, सिंदखेडचे शशिकांत खेडेकर, प्रीती बंड, माजी मंत्री विजय शिवतारे, दिपाली सय्यद यांचा समावेश होता. शिवसेना भवनातून झुम अॅपच्या द्वारे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी राज्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना बोलण्याची संधी दिली होती. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात घेतलेली भूमिका आणि राज्यात कोरोना नियंत्रणात आणन्यासाठी आलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची शेती कर्ज परतफेडीची टक्केवारी राज्यात प्रथम असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राधान्याने शेती कर्जाची प्रोत्साहन रक्कम मिळावी. कोकण सिंचन महामंडळच्या माध्यमातून सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जरोखे काढावेत. जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकासाठी विमा संरक्षणाबाबत आपण लक्ष घालावा. या बाबत असलेली पावसाच्या नोंदीचे निकष बदलण्यात यावेत. काजूच्या जी आय मानांकन बाबत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. चांदा ते बांदा धर्तीवरील सिंधुरत्न योजनेला निधी मिळावा. ग्रामीण भागातील रस्ते विकास आणि छोट्या कामांसाठी पंचवीस पंधरा हेडचा पंधरा कोटी निधी आपल्या मतदारसंघासाठी तात्काळ मिळावा अशी मागणी केली. तसेच सहकार क्षेत्रासाठी राज्यात शिवसेना विशेष विभाग निर्माण करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील तसेच आपल्या मतदारसंघातील पक्षवाढी संदर्भातही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. शनिवारी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत दोन तासाच्या या बैठकीमध्ये राज्यातील प्रमुख दहा ते बारा नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. प्रमुख नेत्यांनी आपली मतं मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षवाडी संदर्भातील वेगवेगळे विषय प्रमुख नेत्यांना दिले आहेत. गेल्या जानेवारीमध्ये दिलेले अभियान याबाबतही त्यांनी चर्चा केली. तसेच कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी उचलावी या दृष्टिकोनातून प्रत्येकाने प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
ओबीसी, मराठा आरक्षणाची माहिती देणार!
शिवसेना पक्षाच्या विभागाच्या बैठका लवकरच घेऊन विभाग स्तरावरील प्रमुखांना राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने घेतलेली भूमिका, या समाजाला सुरू असलेली मदत, आरक्षणाबाबत उचललेले पाऊल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि अडचणी याबाबत सर्व माहिती पुरवली जाईल. ती माहिती जनमानसात पोचवण्याचे काम प्रत्येक शिवसैनिकांची राहील अशी सुचनाही उद्धव ठाकरे यांनी केली.