*कोकण Express*
*बालकांना कोरोना संसर्ग झाल्यास पालकांनी त्यांना घरीच कोणतीही औषधी देऊ नयेत – मुख्यमंत्र्यांचा सल्ला*
बालकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यास पालकांनी त्यांना घरीच कोणतीही औषधी देऊ नयेत असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असण्याच्या पार्श्वभूमीवर, लहान मुलांकरता स्थापन केलेल्या कृती दलाशी त्यांनी आज ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यभरातले बाल रोग तज्ज्ञ या संवादात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बालकांना या लाटेत कोरोना विषाणूची बाधा झाल्यास सर्वात प्रथम पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केले. लहान मुलांवर उपचारादरम्यान, अनावश्यक औषधांचा भडिमार करु नका असा सल्ला त्यांनी डॉक्टरांना दिला. या साथीबाबत बालरोग तज्ज्ञांनी पालकांना मार्गदर्शन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची सर्वतोपरी तयारी करण्यात येत असून कोणत्याही संसाधनांचा तुटवडा जाणवू नये यासाठी काम सुरू असल्याचं ते म्हणाले. या विषाणूचा धोका अजून टळलेला नाही त्यामुळं सर्वांनीच काळजी घेण्याचं आणि नियमाचं पालन करण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे. जून महिन्यापासून लसीची उपलब्धता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करून राज्याच्या हितासाठी आपण टाळेबंदीचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. एकसाथ लस उपलब्ध झाल्यास संपूर्ण राज्याला लसीकरण करण्याची आपली तयारी असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.