*कोकण Express*
*तिलारी धरण क्षेत्रातील वृक्षतोड थांबवा ; ग्रामस्थांची तहसीलदारांकडे मागणी*
तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे येथे सामाईक क्षेत्रात ( सर्वे नं. 51) मध्ये बेसुमार वृक्षतोड होत आहे. या क्षेत्राशी कोणताही संबंध किंवा अधिकार नसलेल्या काही जणांनी राजरोसपणे अतिक्रमण चालू आहे. त्यामुळे संबंधित खातेदार आक्रमक झाले आहेत. चालू असलेली वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित खातेदारांनी लेखी निवेदनाद्वारे दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे केली आहे.
मूळ अनोडे गावातील तिलारी धरणाच्या उजव्या बाजूला बोर्ये वाडी येथील सामाईक क्षेत्रात सर्वे नं. 51 मध्ये काही बिगर खातेदारांनी वृक्ष तोड केली आहे. अजूनही ही वृक्षतोड चालूच आहे. कोरोना काळात कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून अतिक्रमण करून बेसुमार वृक्षतोड करीत आहेत. तीन मे रोजी काही खातेदारांनी तिलारी धरणाच्या माथ्यावरुन तोड होत असल्याचे पाहिले. पाच-सहा लाकूड कापणाऱ्या मशीनचे आवाज येत होते. सामायिक सर्वे नंबर 51 ला लागून तिलारी धरणासाठी संपादित केलेल्या सर्वे नं.30 व सर्वे नं. 43 शासकीय जमीन आहे. तिथेही वृक्षतोड केली जात आहे. त्याबाबत तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांशी मोबाईल वरून माहिती दिली.
त्यानुसार उपविभागीय वनाधिकारी सावंतवाडी यांच्या कार्यालयाशी फोनवरुन संपर्क साधला असता त्यांनी लेखी तक्रार वनविभागाच्या कार्यालयात द्या त्यावर तातडीने कारवाई होईल असे सांगितले. सर्वे नंबर 51 आणि आर्ट्स सर्वे नंबर बाबत माननीय दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कोर्टात 26 एप्रिल 2019 मध्ये प्र. क्र. जमाबंदी / धडेवाटप / एस.आर / 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशी नऊ अपीले दाखल असून त्यावर अजून न्यायनिवाडा झालेला नाही. अशा परिस्थितीत ज्यांचा त्या क्षेत्राशी कोणताही संबंध नाही अशांनी वृक्षतोड करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आम्ही शेतकरी प्रत्यक्ष येऊ शकत नसल्याने आम्ही आमच्या तक्रारी मेल द्वारे संबंधित कार्यालयांना पाठवीत आहोत. अर्जाचा विचार होऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.