*कोकण Express*
*जिल्ह्यात कोरोना लस पुरवठा मुबलक करा…*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
सध्या कोरोनाच्या महामारीने थैमान घातलेले आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत असून त्यामध्ये मृत होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण इतर तालुक्यांच्या प्रमाणात जास्त आहे. तसेच कोरोना नियंत्रणासाठी लसीचा पुरवठाही मुबलक प्रमाणात होत नसल्याने हे प्रमाण अजून वाढत आहे. त्यामुळे कोरोना व्हॕक्सीनेशन लसीचा पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा, अशी मागणी कणकवली पं स सभापती मनोज रावराणे यांनी जिल्हाधिकारी, जि.प.अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच शिक्षण व आरोग्य सभापती, जि. प. सिंधुदुर्ग यांच्याकडे मागणी केली आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन रावराणे यांनी दिले आहे. कणकवली तालुक्यात १ ते १० मे या कालावधीत उत्स्फूर्त जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. त्या निर्णयाला संपूर्ण तालुक्यातून चांगला प्रतिसादही मिळत आहे. परंतु अजूनही रुग्णवाढीचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यासोबतच तालुक्यात प्राप्त होणाऱ्या कोरोनाप्रतिबंध लसीचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. कणकवली जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आणि त्यात मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कणकवली तालुक्यात सध्या एकूण ७ प्रा. आ. केंद्र असून १५ उपकेंद्रे आहेत, जेथे नेटची व सी. एम. ओ. ची सोय आहे. त्यामुळे सदर उपकेंद्रांवरही लसिकरण सुरु झाल्यास इतर केंद्रांवरील गर्दी कमी होईल आणि स्थानिक पातळीवरील लोकांना लस मिळू शकेल. या वर नमुद केलेल्या २२ ठिकाणी लसिकरण करण्यासाठी कमीत कमी २५००० कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ती पावले तातडीने उचलावीत, असे रावराणे यांनी सांगितले आहे.