*कोकण Express*
*नाहक फिरणाऱ्यां कोरोना रुग्णांच्या “हातावर शाई”…*
*संसर्ग टाळण्यासाठी लाॅकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन….*
*पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचना*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
होम काॅरन्टाईन असलेले कोरोना रुग्ण घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे संसर्ग वाढू नये,यासाठी अशा रुग्णांच्या हातावर पेनाची शाई लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
दरम्यान रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात लाॅकडाऊन अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी,त्यासाठी नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे,असेही आवाहन श्री सामंत यांनी केले.काल श्री. सामंत यांनी तहसीलदार कार्यालयाला भेट देत आढावा बैठक घेतली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या काळात महाराष्ट्रात राबवली. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.त्यामुळे कोरोना रोखण्यात यश आले होते.त्यामुळेच ही संकल्पना पुन्हा एकदा सिंधुदुर्ग व रत्नागिरीत राबविण्यात येणार आहे.यासाठी आरोग्य यंत्रणेने कामाला लागावे असे आवाहन राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर,संदेश पारकर,प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसिलदार राजाराम म्हात्रे,वैद्यकीय अधिकारी महेश खलिफे,उत्तम पाटील ,रूपेश राऊळ,विक्रांत सावंत,बाबू कुडतरकर, उदय पारिपत्ये आदि उपस्थीत होते.
श्री सामंत म्हणाले,येत्या काहि दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात ऑक्सीजनचे प्रकल्प उभारण्यात येणार असून यामुळे ऑक्सीजनची कुठली ही कमतरता भासणार नाही.याची काळजी शासनस्तरावर घेतली जाणार आहे. तसेच भविष्यात कोरोनाची तिसरी-चौथी लाट येणार असे वैद्यकीय श्रेत्रातील तज्ञ सांगत आहेत. त्यामुळेच योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.तसेच रूग्ण संख्या नियंत्रित राहिली पाहिजे.यासाठी लाॅकडाऊन अत्यंत गरजेचे असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सिंधुदुर्ग व रत्नागिरीत जिल्ह्यात राबविण्यात येणार असून ५ ते १५ मे या कालावधीत त्याचा पहिला टप्पा असणार आहे.या मोहिमेत आरोग्य विभागाचे कर्मचारी पंचायत समितीच्या कर्मचा-यांना सोबत घेऊन ही मोहीम घराघरात जाऊन राबविण्यात येणार आहे.