*कोकण Express*
*खारेपाटण चेकपोस्टवरून साडे सहा हजारहून अधिकजण जिल्ह्यात दाखल*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने सेकंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तर नुकतीच राज्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे मुंबईकर चाकरमानी सध्या आपल्या गावाकडे यायला निघाले आहेत. गेल्या दोन दिवसांत ही संख्या अधिक वाढली असून आज दिनांक 1 मे 2021 सकाळी 11 पर्यंत सुमारे 6642 एवढे बाहेरील नागरिक खारेपाटण चेकपोस्ट येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
आज पहाटे पासून मुंबईवरून खाजगी बसेसने नागरिक गावी येण्याचे प्रमाण वाढले असुन खारेपाटण चेक पोस्ट येथे नाव नोंदणी करण्यासाठी चाकरमान्यांची लाईन लागली होती.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण चेकपोस्ट येथे आरोग्य व महसूल पथक कायमस्वरूपी ठेवण्यात आले असून मुंबईवरून तसेच बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची व त्यांच्या वाहनांची रजिस्टर ला नोंदणी केली जात आहे. जर एखाद्या प्रवाशाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्याची तात्काळ रॅपिड टेस्ट देखील खारेपाटण चेकपोस्टला केली जात आहे. आज शनिवार दि. 1 मे 2021 पर्यंत खारेपाटण चेकपोस्ट येथे बाहेरून येणाऱ्या 225 नागरिकांची आतापर्यंत रॅपिड टेस्ट करण्यात आली असून यापैकी फक्त 3 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत 222 नागरिकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
खारेपाटण चेक पोस्ट येथील आरोग्य पथकाच्या वतीने मुंबईवरून येणाऱ्या चाकरमानी वर्गाच्या हातावर होम क्वारंटाईन चे शिक्के मारले जात आहेत. तर गेल्या दोन दिवसात गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकर चाकरमान्यांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. येथील आरोग्य पथकात डॉ. प्रणाली कदम, प्राथमिक शिक्षक सीताराम पारधिये, सत्यवान चव्हाण,अमोल तुपविहीरे, राजेश तेरावणकर, सत्यवान केसरकर तसेच सहायक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, खारेपाटण पोलीस पराग मोहिते, सुयोग पोकळे, रमेश नारणवर आदी अधिकारी कर्मचारी काम करीत आहेत.