*कोकण Express*
*कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांना कोव्हीड लस द्यावी*
*प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेची प्रशासनाकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेले काही महिने निद्रीस्त असलेल्या कोविडच्या विषाणूने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे आणि यावेळी त्याचा संक्रमणाचा वेग अजूनही वाढला आहे. या कोविडच्या महामारीपासून लोकांना वाचवण्यासाठी अनेक कोविड योद्धे विज्ञानाच्या आयुधांनी सज्ज होऊन रणांगणात उतरलेत. आपल्या जीवीताची पर्वा न करता सर्वसामान्य लोकांना या महामारीपासून वाचवण्यासाठी ते रात्रंदिवस एक करत आहेत. मग त्यात डॉक्टर, प्रशासकीय, शासकीय कर्मचारी, पोलिस यंत्रणा हे सारे घटक आपली भूमिका चोख बजावताना दिसून येतात. त्यातलाच एक घटक म्हणजे प्राथमिक शिक्षक.
गेले वर्षभर कणकवली तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करून रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट अशा सर्वच ठिकाणी आपले कर्तव्य अगदी चोख बजावले आहे. आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग, जि. प., पं. स. कर्मचारी आदींना covid-19 प्रतिबंधात्मक लस देण्यात आलीय. परंतु प्राथमिक शिक्षकांना लस देण्याबाबत अजून नियोजन करण्यात आलेले नाही. ते तातडीने करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कणकवली यांच्यामार्फत प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
शिक्षकांचा संपर्क थेट विद्यार्थी, पालक यांच्याशी येत आहे. तसेच रेल्वे स्टेशन, चेक पोस्ट वर ड्युटी बजावत असताना प्रवाशांशी थेट संपर्क येत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी काम करणे अत्यंत जोखमीचे असल्याने प्राथमिक शिक्षकांना covid-19 प्रतिबंधात्मक लस दिली जावी. तसेच चेक पोस्ट, रेल्वे स्टेशन किंवा covid-19 संदर्भात इतर ड्युट्या काढण्यात येऊ नयेत, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती कणकवली शाखेने प्रशासनाकडे केली आहे.