*कोकण Express*
*जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना*
*अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कामात कसूर केल्यास होणार कडक कारवाई*
*जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचा आदेश*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिंवस वाढतच चाललाय. जिल्ह्यातही दररोज सापडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सरासरी शंभरीत जावून पोहोचलेय. त्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत विविध योजना, यंत्रणा कार्यान्वित करूनही कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला रोखण्यात कुठेतरी कमतरता जाणवतेय. त्यासाठी आता काहीतरी ठोस पावले उचलण्याची शक्यता निर्माण झालीय. म्हणूनच जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली एक टास्क फोर्स बनवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी १९ एप्रिल, २०२१ रोजी जारी केलेल्या एका पत्रकातून दिले आहेत. त्यासाठी योग्य नियोजन व सुसूत्रिकरणासाठी विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.
या प्राधिकरणात कार्यकारी अभियंता, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग उपविभाग, सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधीक्षक (उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय), सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत तसेच सर्व गट विकास अधिकारी यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यासर्वांनी आपल्या कामकाजाचा दैनंदिन अहवाल सकाळी 11.00 वाजता संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावयाचा आहे. सदर कामाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या कामात कसुर आढळल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना नियम २०२० अन्वये होणाऱ्या कारवाईस पात्र राहतील, अशी सक्त ताकिद जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.