*कोकण Express*
*बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई; पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त!*
*बेकायदेशीर दारु वाहतुकीवर कारवाई; पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त!*
*बांदा ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावर मळगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतुक करीत असताना यावर कारवाई करत एकुण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले गेले आहेत.
एकूणच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत दारू साठ्या सह एकूण ५० लाख ४२ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चालकाला अटक करण्यात आली असून त्यावर दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात संचार बंदी सुरू असताना चोरट्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतूकिवर लक्ष ठेवून व सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क विभाग सज्ज होता.
त्यापार्श्वभूमीवर सापळा रचण्यात आला होता. मळगाव येथे झाराप पत्रादेवी मार्गाजवळ मुबंईच्या दिशेने जात असलेला टेम्पो (जी जे ०१ डी वाय ७७११) शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास तपासणी साठी थांबविण्यात आला. यावेळी तपासणी केली असता ४८० बॉक्स आढळून आले. या करवाईत वाहन चालक श्रवणकुमार बिष्णोई (वय ३३, जालोर, राजस्थान) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या कारवाईत ४० लाख ३२ हजार रुपयांच्या दारू साठा तसेच टेम्पो आणि मोबाईल सह एकूण ५० लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुली यांनी मोठी कारवाई केली.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ बी एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक एस एच चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए ए पाडळकर, कर्मचारी रमेश चंदूरे, शरद साळुंखे , संदीप कदम, एच आर वस्त यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक एस एच चव्हाण करीत आहेत.