*कोकण Express*
*जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची अँटीजेन, आरटीपीसीआर टेस्ट होणार*
*पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती; आवश्यकता असेल तेथे शिक्षकांना कोविडच्या कामासाठी घेण्याच्या सूचना*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना आहार देण्याचा जो ठेका देण्यात आला होता त्या ठेकेदारांना १२० वरून १७५ रुपये जेवण-नाश्ता देण्याचा दर देण्यात आला आहे. या दरात सुमारे ५५ रुपयांची वाढ करण्यात आली असून जेणेकरून तेथे दाखल असलेल्या रुग्णांना पौष्टिक अन्न मिळावे हा त्यामागील उद्देश असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये देखील लवकरच नवीन ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात येणार आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात देखील अशा प्लांटची आवश्यकता भासल्यास डीपीडीसीमधून निधी देऊन त्याला मंजुरी देण्यात येईल असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय हे स्वतःला लागणारा ऑक्सिजन स्वतः तयार करणारे हॉस्पिटल आहे, असेही गौरवोद्गार पालकमंत्री यांनी काढले. आतापर्यंत सिंधुदुर्गवासीयांनी संयम बाळगून जसे सहकार्य केले तसेच सहकार्य कोविड संपेपर्यंत करावे असे आवाहनही सामंत यांनी केले. ज्या जिल्ह्यांना आवश्यकता आहे त्यांना रेमडेसीविरच्या इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची ग्वाही अन्न व औषध प्रशासन चे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिल्याची माहिती सामंत यांनी दिली. कोविडच्या या रुग्नासोबत जे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये येतील त्याचीही जिल्ह्यात कोरोना स्वॅब टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. ज्या रूग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होतील त्या सर्वांची कोविड टेस्ट केली जाणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेने जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या लोकांची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सीमीटरने तपासणी सुरू आहे. मी पालकमंत्री आहे हे माहिती असताना देखील आज रेल्वेस्टेशन वर माझी तपासणी करण्यात आली. आरोग्य यंत्रणेवर जो ताण आला आहे तो दूर करण्याच्या सूचना प्रांताधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. याकरिता थर्मल स्कॅनिंगसाठी बसविलेल्या पथकांमध्ये शिक्षकांचा समावेश करण्याच्या ही सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अँटीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचेही पालकमंत्री यांनी याप्रसंगी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविड काळात कशाप्रकारे काम करतात हे महाराष्ट्रातील घराघरातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे कोणी केलेल्या टीकेला उत्तर द्यायचे मला गरज वाटत नाही असा टोला सामंत यांनी लगावला. देशाची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान हे काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. जर मुख्यमंत्री मातोश्रीमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्स घेतात त्यावर टीका होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करतात? असा सवालही पालकमंत्री उदय सामंत यांनी केला. संपूर्ण देशात पश्चिम बंगालमध्येच कोरोना संपला. त्यामुळे तेथे केंद्र सरकारने नेमकी काय उपाययोजना केली त्याची माहिती जर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारला दिली तर त्याचा उपयोग राज्य सरकारला घेता येईल असा उपरोधिक टोलाही सामंत यांनी लगावला. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितिन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, तहसीलदार आर. जे. पवार, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे, डॉक्टर पोळ, आदी उपस्थित होते.