*कोकण Express*
*लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दारू साठ्याचा प्लान उधळला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीहून कासार्डे च्या दिशेने स्विफ्ट कार मधून गोवा बनावटीची ७५ हजार किमतीची विनापरवाना दारू वाहतूक करत असताना कणकवली पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी सह मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई १४ एप्रिल रोजी रात्री ०९:४५ वा च्या सुमारास कासार्डे येथे महामार्गावर करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार रुपेश गुरव, रमेश नारनवर, नितीन खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईत दारू व स्विफ्ट कार मिळून २ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत रमेश नारनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी यतीन उर्फ शरद डिचोलकर (रा. आंबेरी – तालुका मालवण) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नारनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महामार्गावरून स्विफ्ट कार मधून विनापरवाना दारू वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना मिळाल्या नुसार त्यांनी याबाबत कासार्डे दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार रमेश नारनवरे यांना फोनद्वारे कल्पना दिली. सदर स्विफ्ट कार (MH 01 VA 1998) ही कासार्डे येथे थांबविण्याची सूचना केली. त्यानुसार श्री नारनवर व श्री खाडे यांनी कासार्डे येथे महामार्गावर पोकळे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचला. या गाडीचा नांदगाव पासून कासार्डे पर्यंत श्री खरात व श्री गुरव यांनी आपल्या खाजगी वाहनाद्वारे पाठलाग सुरू ठेवला होता. महामार्गावरून नांदगाव येथून सदर स्विफ्ट कार कासार्डे च्या दिशेने क्रॉस झाल्याची माहिती थांबलेल्या कासार्डेतील पोलिसांना देण्यात आली. कासार्डे येथे स्विफ्ट कार दिसतात तेथे थांबलेल्या पोलिसांनी कार थांबवली. या पाठोपाठ पाठलाग करत असलेले श्री खरात व श्री गुरव हे घटनास्थळी दाखल झाले. व कारची तपासणी केली असता कारच्या मागील डिकीत २५ बॉक्स मध्ये गोल्डन एस ब्ल्यू फाईव्ह व्हीस्की ही दारू असल्याचे आढळून आले. लॉकडाऊन ची अंमलबजावणी होत असतानाच गोव्याहून विनापरवाना दारू साठा करण्याचा प्लान कणकवली पोलिसांनी उधळून लावत केलेल्या धडक कारवाई बद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.