कणकवली न.पं.च्या वतीने लवकरच कोविड केअर सेंटर

कणकवली न.पं.च्या वतीने लवकरच कोविड केअर सेंटर

*कोकण Express*

*कणकवली न.पं.च्या वतीने लवकरच कोविड केअर सेंटर…*

*नगराध्यक्ष समीर नलावडे : शहरवासीयांसाठी मोफत उपचार व सुविधा…*

​*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे या रुग्णांना योग्य उपचार मिळावे त्यांना उपचारासाठी जागा उपलब्ध व्हावी या दृष्टीने कणकवली नगरपंचायतच्या वतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकेमार्फत उभारण्यात येणारे बहुदा हे पहिले कोविड केअर सेंटर असणार आहे. मागील लॉकडाऊनच्या काळात कमळ थाळी सारखा स्तुत्य उपक्रम राबविल्या नंतर आता या लॉकडाऊनच्या कालावधीत नगराध्यक्षांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत कोविड रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. या दृष्टीने नगराध्यक्ष नलावडे यांनी नियोजन केले असून, या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यतेसाठी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी या कोविड केअर सेंटरला मान्यता दिल्यावर ते शहरातील रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही नलावडे यांनी सांगितले. कमळ थाळी सारख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या नावीन्यपूर्ण संकल्पने पाठोपाठ जिल्ह्यात मॉडेल तत्त्वावर ही नावीन्यपूर्ण संकल्पना अमलात आणण्याचा मानस नलावडे यांनी व्यक्त केला आहे. कोरोणाचा जिल्ह्यात उद्रेक सुरू असताना रुग्णांना उपचारासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने, कणकवली शहरातील रुग्णांना अन्य ठिकाणी जावे लागू नये व त्यांना मोफत उपचार मिळावेत या दृष्टीने नलावडे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत आमदार नितेश राणे यांचे देखील लक्ष देण्यात आले असून, त्यांनी देखील या संकल्पनेला पाठिंबा दिल्याची माहिती नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतच्या पर्यटन सुविधा केंद्र येथे नलावडे यांनी सेंटरसाठी जागा निश्चित केली असून, या ठिकाणी ​२५ बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर टायशेटे यांच्याशी देखील संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या कडील डॉक्टरांकडून या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना व उपचार व देखरेख करण्यात येणार आहे. या करिता पर्यटन सुविधा केंद्राची साफसफाई करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे या बाबत परवानगी मागण्यासाठी लवकरच संपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
या सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, व बाथरूमची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र कणकवली शहर मर्यादितच हे कोविड केअर सेंटर कार्यान्वित राहणार असल्याचे नलवडे यांनी सांगितले. या सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळाल्यानंतरच ते कार्यान्वित केले जाईल असेही नलावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!