*कोकण Express*
*खारेपाटण पंचशील नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती खारेपाटण पंचशील नगर येथे पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात सम्पन्न झाली. या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे अध्यक्ष मोहन पगारे (नडगिवे), कार्यकर्ते दीपक जाधव (वायंगणी),जितेंद्र कदम (खारेपाटण) राजापूर तालुका संघटनेचे बौधाचार्य महेंद्र पवार, खारेपाटण संघटनेचे बौधाचार्य संतोष मधुकर पाटणकर तसेच खारेपाटण गटविकास सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष प्रभाकर पोमेडकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, माजी ग्रा. पं. सदस्या युती पोमेडकर, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा आकांशा पाटणकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी खारेपाटण पंचशील नगर येथील “धम्म संस्कार केंद्र” येथील बुद्धमूर्ती समोर सामुदायिक रित्या बुद्धपूजा पाठ घेण्यात आला. संतोष जुवाटकर यांच्या शुभहस्ते पुष्पफुले अर्पण करण्यात आली. यानंतर खारेपाटण पंचशील नगर येथील ‘बुद्धविहाराच्या” प्रांगणात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयाला बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेचे अध्यक्ष मोहन पगारे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोहन पगारे,संतोष तुरळकर, प्रभाकर पोमेडकर, आकांशा पाटणकर, आस्था पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका विशिष्ट समाजाचे किंवा जातीचे नसून अखंड भारत देशाचे राष्ट्र निर्माते आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही सर्व स्तरातील समाज घटकामध्ये जेव्हा साजरी केली जाईल त्यावेळी खऱ्या अर्थाने या देशामध्ये सामाजिक समता स्थापन झालेली दिसेल. बाबासाहेबांची जयंती ही उत्सव न होता ती विचारांची जयंती म्हणून साजरी केली पाहिजे.”असे भावपूर्ण उदगार कार्यक्रमाचे अध्यक्ष व पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे अद्यक्ष संतोष पाटणकर यांनी काढले. तर यावेळी “भीम बुद्ध” गीतांचा कार्यक्रम पंचशील नगर खारेपाटण येथील मुलांनी सादर केला.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते अशोक पाटणकर, धीरज जुमलेकर,संदीप पाटणकर,प्रथमेश कदम,मधुकर पाटणकर,दीपक गोवळकर, राहुल पाटणकर, सागर पोमेडकर, मकरंद पाटणकर यांनी सहकार्य केले.