*कोकण Express*
*पांडवेश्वर मध्ये विजयाची गुढी उभारणार*
*अतुल काळसेकर यांचा वज्रनिर्धार*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
गुढीपाडव्यादिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षांच्या वनवसानंतर अयोध्येत परतले होते. प.बंगालच्या पांडवेश्वर मतदारसंघातील जनतेच्या दारिद्र्याचा वनवास संपुष्टात आणून भाजपा उमेदवाराच्या विजयाच्या माध्यमातून 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानानादिवशी मतपेटीद्वारे विकासाची गुढी उभारण्याचा वज्रनिर्धार सिंधुदुर्गचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा प.बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपाचे स्पेशल ऑब्झरवर अतुल काळसेकर यांनी केला आहे. सध्या प. बंगालमध्ये अतुल काळसेकर यांच्यासह विनोद तावडे, ऍड आशिष शेलार, प्रमोद जठार, राजू राऊळ हे सिंधुदुर्ग चे भाजपाचे चेहरे खिंड लढवत आहेत.त्यासोबत निरंजन डावखरेही आहेत.
पक्षीय बलाबल पाहिलं तर प.बंगालमध्ये 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनुसार सत्ताधारी असलेल्या टीएमसी अर्थात तृणमूल काँग्रेस चे पारडे सध्या जड आहे. परंतु 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प.बंगाल मध्ये जोरदार मुसंडी मारत आपले मताधिक्क्य वाढवले आहे. पांडवेश्वर च्या लोकसभा मतदारसंघात भाजपाने 62 हजार मते घेत 4 हजार 500 चे लीड मिळाले होते. भले सध्या भाजपाचे आमदार कमी असले तरी सध्याच्या विधानसभा निवडणुकीत प.बंगालमध्ये कमळ फुलवायचेच या इराद्याने खुद्द पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाने ममतादीदींसमोर शड्डू ठोकलाय. वाचकहो युद्ध जिंकण्यासाठी केवळ मनगटात जोर असून चालत नाही तर शक्तीला बुद्धीची जोडही लागते. युद्ध जिंकायचे असेल..मग ते युद्ध मैदानातील असो अथवा निवडणुकीच्या रिंगणातील… त्यासाठी लागतो दुर्दम्य आत्मविश्वास…हा सेल्फ कॉन्फिडन्सच अविश्वसनीय असा भीमपराक्रम घडवून जातो. प.बंगालमध्ये नेमकं हेच करण्याची भाजपाची रणनीती आहे. अतुल काळसेकर यांच्यावर स्पेशल ऑब्झरवर म्हणून जबाबदारी असलेल्या पांडवेश्वर विधानसभा मतदारसंघात टीएमसी चे विद्यमान आमदार आणि निवडणूकीआधी भाजपात दाखल झालेले जितेंद्र तिवारी हे भाजपचे उमेदवार आहेत. 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला केवळ 13 हजार मते मिळाली होती. 2 लाख 76 हजार मतदार असलेल्या पांडवेश्वर मतदारसंघात तिवारी यांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी अतुल काळसेकर यांच्या खांद्यावर आहे. होय… तिवारी ना निवडुन आणणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे कारण तिवारी जरी भाजपात आले असले तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र टीएमसी तच आहेत. अतुल काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प.बंगालमध्ये प्रचंड राजकीय दहशत आहे. भाजपा कार्यकर्त्यांना मारझोड करून गनपॉइंट वर ठेवून धमकावले जात आहे. भाजपा मंडल कार्यालयाबाहेर जिवंत बॉम्ब फेकले जातायत. एवढ्या दहशतीतही भाजपा कार्यकर्ता तसूभरही मागे न हटता पांडवेश्वर जिंकायचेच या इराद्याने पेटून उठलाय. कार्यकर्त्यांमध्ये हा जोश भरण्यात काळसेकर यांचाही महत्वाचा वाटा आहे. वाचकहो…रामायणातील बजरंगबली चा एक किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतोय…हनुमान प्रचंड शक्तिशाली असले तरी बालपणातील त्यांच्या खोड्यानी त्यांना त्यांच्या शक्तीची जोवर कुणी जाणीव करून देत नाही तोवर त्यांना आपल्या शक्तीची जाणीव होणार नाही हा शाप मिळाला होता.लंकादहनाआधी बजरंगबली ना त्यांच्यातील शक्तीची जाणीव जांबुवंताने करून दिली होती.त्यानंतर लंकादहन मारुतीने केले होते.प.बंगालमधील भाजपाच्या हरेक कार्यकर्त्यांमध्ये ही मारुतीशक्ती भरण्याचे काम भाजपश्रेष्टी करताहेत.पांडवेश्वर हा मतदारसंघ कोळसा खाणपट्टा आहे.मायनिंगमाफिया टीएमसी च्या बाजूने तर दहशतीखाली असणारी गोरगरीब जनता मजूर वर्ग भाजपाच्या बाजूने आहे. भाजपा कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाकडून मारहाण झाली तरी भाजपाचे कार्यकर्ते कट्टर आहेत.केवळ बुथप्रमुख च नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल ही उंचावलेले आहे.तब्बल 237 बूथ असलेल्या या मतदारसंघात पन्नाप्रमुख ही संकल्पना अतुल काळसेकर यांनी जोरदार राबवली आहे. एक पन्ना म्हणजे 60 मतदार …आणि या 60 मतदारांमागे 1 कार्यकर्ता अशी ग्राउंड प्रचारनिती काळसेकर यांनी पांडवेश्वर मतदारसंघात राबवली आहे. दरदिवशी किमान 25 ते 30 बुथप्रमुखांच्या बैठका काळसेकर घेतायत..या प्रचारात कुडाळ मधून काळसेकर यांच्यासोबत गेलेले राजू राऊळ हेही काळसेकरांच्या खांद्याला खांदा लावून पांडवेश्वर चे मैदान पिंजून काढताहेत. येत्या 5-6 दिवसांत सर्व बुथप्रमुखांच्या बैठका पूर्ण करून उर्वरित दिवसांत प्रचाराची पुढील रणनिती आखली जाणार आहे.सध्या प्रचारासाठी कार्यकर्त्याच्या घरी, खळा बैठक, रिक्षारॅली चा फंडा वापरला जात आहे. भाजपाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी हे 1950 साली प.बंगालचे मुख्यमंत्री होते.प.बंगालमध्ये भाजपाची सत्ता यावी हे त्यांचे स्वप्न 2021 मध्ये साकारण्यासाठी भाजपाची टीम मेहनत घेत आहे. केंद्रातील मोदी सरकारने केलेला विकास, जनधन खात्यातून आम आदमीला मिळालेले पैसे, उज्वला गॅस योजनेतून मिळालेला सिलेंडर गॅस, पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेली घरकुले, लॉकडाऊन काळात गरिबांना मोफत मिळालेले तांदूळ, साखर, तूरडाळ आदी रेशन साहित्य यामुळे मतदार भाजपाच्या बाजूने असल्याचा दावा अतुल काळसेकर करतात.148 जागांची मॅजिक फिगर भाजपा पूर्ण करणार आणि उत्तरप्रदेशप्रमाणेच प.बंगालमध्ये सत्तारूढ होणार ..आणि या ऐतिहासिक विजयाचा सक्रिय साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभणार हा विश्वास अतुल काळसेकर यांना आहे.