*कोंकण एक्सप्रेस*
*शेतकर्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे अवास्तव खर्चिक*
*शेतकर्यांनी नाकारली संधी*
*चार आण्याची कोंबडी नि ….भाई चव्हाण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्यातील कृषी विभागाने दरवर्षीप्रमाणे राज्यातील शेतकर्यांचे देशाबाहेर अभ्यास दौर्यांच्या राज्य पुरस्कृत योजनेतंर्गत ३६ जिल्हास्तरीय १७० शेतकर्यांच्या नुकत्याच सोडती काढल्यात. १० शेतकर्यांच्या निवडी या शिफारशीनुसार केल्या जातात. पण परिपत्रकात नमूद केलेल्या कमाल खर्चाच्या दिड पट्टीहून अधिक खर्चाचे अंदाजपत्रक निवड झालेल्या शेतकर्यांना आगावू भरावे लागेल असे कृषी विभागाने संबंधित निवड झालेल्या शेतकर्यांना कळविले आहे. परिणामी बहुसंख्य शेतकर्यांनी हे खर्चाचे अंदाजपत्रक डोईजड असल्याने ही परदेश गमनाची संधी नाकारणेच अधिक उचित ठरविले आहे, अशी माहिती अ. भा. आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी कृषी विभागाने नियुक्त करण्यात आलेल्या खाजगी ट्रॅव्हल एजेन्सीने खर्चाच्या कमाल अडीज लाख रुपये मर्यादेपेक्षा अंदाजपत्रकात रुपये अडीज लाख रुपयांच्या ठिकाणी सुमारे सव्वाचार लाख रुपये खर्च होईल, असे अंदाजपत्रक दिले आहे. परिणामी राज्यातील निवड झालेल्या १७० शेतकर्यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरविणे पसंत केले आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी ही शेतकर्यांची क्रुर थट्टा असून चार आण्यांची कोंबडी नि बारा आण्यांचा मसाला अशी अवस्था या स्तृत्य योजनेची असल्याचे स्पष्ट केले आहे.
सन २०१३ पासून राज्य पुरस्कृत योजना म्हणून शेतकर्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित केले जात आहेत.
विविध देशांनी विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकर्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत संबंधित देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी, तसेच कृषी संबंधी संस्थांना भेटी इत्यादीद्धारे शेतकर्यांना ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकर्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रति शेतकरी रुपये एक लाख अनुदान दिले जाते. उर्वरित खर्च हा संबधित शेतकर्यांनी पदरमोड म्हणून करावयाचा आहे, अशी परिपत्रकातील माहिती देऊन ते म्हणतात, यापूर्वी काही वर्षें सधन शेतकर्यांनी एक दिड लाख पदरमोड करुन दौर्यांत सहभागी होत होते
मात्र गेल्या १३ वर्षांत विमान प्रवास, रहाण्याची सोय, जेवण आदी खर्चात दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे. मात्र अनुदानाचा एक लाख रुपयांचा आकडा काही वाढविला जात नाही. त्यामुळे या चांगली उद्दिष्ट असलेल्या योजनेला ब्रेक लागत आहे.
या योजनेत एकूण ६ विविध शेती विषयक विषयांवरील गट तयार करण्यात येतात. त्यानुसार संबंधित देशांची निवड करण्यात येते, अशी माहिती देऊन ते पत्रकात म्हणतात, फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन या विषयावर युरोप मधिल नेदरलॅडस, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांची १२ दिवसांचा परदेशी अभ्यास दौरा मुकर करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पहिल्या पत्रकात या दौर्याचा कमाल खर्च अडीज लाख नमूद करण्यात आला आहे. मात्र दौर्यांचे नियोजन करणार्या प्रवासी एजन्सीने प्रत्यक्षात खर्च हा रुपये ४ लाख १९ हजार येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रुपये १ लाखाचे अनुदान वजा करून आगाऊ रुपये ३ लाख १९ हजार रुपये संबंधित ऐजन्सीत भरावे लागतील. इस्त्राईल गट,जपान, मलेशिया व्हिएतनाम आणि फिलीपाईन्स गट, चीन गट, दक्षिण कोरिया गट यासाठी शेतकऱ्यांना अनुक्रमे रुपये २ लाख ५५ हजार, २ लाख ८९ हजार, २ लाख १४ हजार, १ लाख ७१ हजार आणि १ लाख ९९ हजार एवढी आगावू रक्कम संबंधित प्रवासी ऐजन्सीत भरावे लागणार आहेत.
उपरोक्त आकडेवारी अभ्यासली तर केसरी, विणा वर्ड आदी प्रथितयश ट्रॅव्हल्सच्या संबंधित देशाच्या पर्यटन सहलीच्या खर्चाच्या तुलनेत दिड पट्टीहून अधिक आहे, अशी माहिती देऊन ते म्हणतात, राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाची अधोगती, ग्लोबल वार्मिंग आदीं कारणांमुळे मेटाकुटीला आला आहे. तरीही शेतकऱ्यांना भविष्यकालीन भवितव्यासाठी असे दौरे एक आशेचा किरण वाटतो. पण अशा शासनमान्य दौर्यांतून शेतकर्यांची लूट केली जात असेल तर ते पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच भुषणावह नाही. तसेच अशा दौर्यांचे १३ वर्षें चालू असलेली अनुदानाची रक्कम रुपये १ लाखाऐवजी किमान २ लाख रुपये पर्यंत वाढविणे आवश्यक आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या परदेश अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या १२ शेतकर्यांच्या अर्जांपैकी ५ जणांची निवड ८ ऑगस्टला सोडत पद्धतीने करण्यात आली. त्यामध्ये कृषी पुरस्कार विजेते हिर्लोक येथील बाजीराव बच्चाराम झेंडे, २ महिलांतुन कालेली येथील सौ. प्रतिभा सुजित भालेकर, निरवडे येथील प्रणय आत्माराम नाडकर्णी, तळीगाव – माणगाव येथील विठ्ठल भिवा सावंत आणि हळवल – कणकवली येथील डॉ. गणपत (भाई) यशवंत चव्हाण यांचा समावेश आहे. मात्र या दौर्यासंबधी ६ गटांमध्ये इच्छित प्राधान्यक्रम देऊन स्वीकृत्तीपत्र कृषी विभागाकडे देण्याची मुदत २५ ऑगस्ट असतानाही अद्यापपर्यंत निवड झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ शेतकर्यांपैकी एकाही शेतकर्याने भरमसाठ आणि अवास्तव खर्चामुळे या दौऱ्यासाठी जायला असमर्थता व्यक्त केली आहे.
—-+ —-+—–+—-+ —+ —
सोबत प्रसिध्दीसाठी माझी छायाचित्रे पाठवित आहे. तसेच हा राज्यस्तरीय विषय असल्याने वृत्तपत्रांनी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या. बातमीला राज्यस्तरीय प्रसिद्धी द्यावी, अशी नम्र विनंती.
गणपत तथा भाई चव्हाण.