महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड*

*कणकवली । प्रतिनिधी*

महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून, तर श्री. धनंजय यादव यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनने २८ ऑगस्ट, २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, काजू क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेल्या श्री. मनीष दळवी यांची निवड करण्यात आली आहे. मूळचे वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा येथील असलेले श्री. दळवी यांचा अनुभव मंडळाला काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, सहकारी काजू प्रक्रिया प्रकल्प महासंघाचे प्रतिनिधी म्हणून श्री. धनंजय यादव यांचीही स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती काजू प्रक्रिया उद्योगातील विविध पैलूंना अधिक बळकट करेल.
राज्यातील काजू पिकाच्या विकासाला चालना देण्यासाठी १६ मे, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना झाली होती. सुरुवातीला या मंडळात एक अध्यक्ष, १२ संचालक आणि एक सदस्य सचिव होते. मात्र, २२ ऑगस्ट, २०२५ च्या नवीन शासन निर्णयानुसार मंडळाची रचना बदलण्यात आली आहे. त्यानुसार, स्वतंत्र संचालकांची संख्या ४ वरून ११ पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे मंडळाला विविध क्षेत्रांतील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. श्री. दळवी आणि श्री. यादव यांची नियुक्ती याच सुधारित रचनेचा भाग आहे, ज्यामुळे मंडळाला अधिक व्यापक आणि अनुभवी नेतृत्व मिळेल.

*मनीष दळवी यांच्या निवडीमुळे भविष्यातील जिल्ह्यातील काजू उद्योगांना होणार फायदा*

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांच्या काजू बोर्डावरील नियुक्तीमुळे राज्यातील काजू उत्पादक शेतकरी आणि प्रक्रिया उद्योगांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग काजू मंडळाचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्यातील काजू उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढणे आणि या क्षेत्राचा विकास सुनिश्चित करणे शक्य होईल. या नियुक्त्या महाराष्ट्रातील काजू उद्योगाला नवी दिशा देतील, असा विश्वास जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकरी तसेच काजू व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!