*कोंकण एक्सप्रेस*
*पायी दिंडीचा देखावा – भक्तिभावाची अनुभूती*
आमच्या घराच्या शेजारून दरवर्षी जाणाऱ्या पायी दिंडीचे मला नेहमीच विलक्षण कौतुक वाटते. टाळ–मृदंगाच्या गजरात, अभंग आणि कीर्तनांच्या स्वरांतून विठ्ठलभक्तांची ही यात्रा भारावून टाकणारी असते. भक्तांना या दिंडीची माहिती करून द्यावी, या उत्सुकतेपोटी यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा देखावा साकारण्यात आला आहे.
भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथून पौष कृष्ण एकादशीला या पायी दिंडीची सुरुवात होते. करुळ, लोरे नं. १, वैभववाडी, शेणवडे, कोपरडे, हेरले, हातकणंगले, शिरोले, मिरज, नरसिंहगाव, जुनोनी व कमलापूर अशा १२ ठिकाणी मुक्काम घेत वारकरी आपला १३ दिवसांचा प्रवास पूर्ण करतात. अखेरीस माघ शुद्ध एकादशीला वारकऱ्यांचा काफिला पंढरपूर येथे पोहोचतो. येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन, मामासाहेब दांडेकर आश्रमात वारकरी विसावा घेतात.
या दिंडीमध्ये टाळ–मृदंगाचा अखंड निनाद, अभंग–भजनांचा ओघ, हरिपाठ–कीर्तनांचा गजर आणि नामस्मरणाचा अखंड उत्सव असतो. हा सोहळा केवळ धार्मिक नाही तर एक भक्ती, ऐक्य आणि संस्कृतीचा जिवंत अनुभव आहे.
विशेष म्हणजे, हा देखावा उभारताना पर्यावरणाचा विचार करून कागद व पुठ्ठा यांसारख्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा उपक्रम पूर्णपणे इको–फ्रेंडली स्वरूपात साकारला असून, निसर्गाशी एकात्मता राखत वारकरी परंपरेचा संदेश दिला आहे.
हा देखावा मी – श्री मिलिंद पुंडलीक रावराणे (चित्रकार) आणि माझे रावराणे बंधु यांच्या सहकार्याने साकारला आहे. हा उपक्रम लोरे नं. ०१, शिवगंगावाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे उभारण्यात आला आहे.