*कोंकण एक्सप्रेस*
*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजारात नागरिकांची गर्दी**
*वेंगुर्ला ः (प्रथमेश गुरव)
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या आहेत. आज रविवारी वेंगुर्ल्याचा आठवडा बाजार असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी करीत विविध सामानांची खरेदी केली. दरम्यान, रोजच्यापेक्षा भाजीचे दर वाढलेले दिसून आले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. दैनंदिन फळभाजी, पालेभाजीसोबतच सजाटवीचे साहित्य, पूजा साहित्य, फळे-फुले आदी बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आकर्षक दिसणारे सजावटीचे साहित्य आणि विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहेत. गणेशोत्सवासाठी काही विक्रेत्यांनी बाजारपेठेत विविध साहित्यांची दुकाने मांडली आहेत. आज वेंगुर्ल्याचा आठवडा बाजार असल्याने पंचक्रोशितील किरकोळ विक्रेत्यांनी सकाळीच आपली उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणली. नागरिकांनीही गर्दी करीत साहित्याची खरेदी केली. नेहमीपेक्षा भाजीचे दर वाढल्याचे दिसून आले. मंगळवारी हरितालिकाव्रत असल्याने आजपासूनच हरितालिकेच्या मूर्त्यात बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. गणेशोत्सवाप्रमाणेच गौरीचा सणही महिलावर्ग उत्साहाने साजरा करतात. या सणात ‘ओवसा‘ भरण्यासाठी लागणारी सुपं तसेच रवळी आदी साहित्य विक्रीसाठी आले आहेत.
मागील आठवड्यात जोरदार वर्षाव केलेल्या पावसाने ब-यापैकी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना खरेदीसाठी दिलासा मिळाला असून आज कडकडीत पडलेल्या उन्हाने घामाच्या धारा ओघळत होत्या.