*कोंकण एक्सप्रेस*
*विभाग नियंत्रकाकडून प्रवासी संघटनेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता*
*वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका प्रवासी संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमान कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या मुख्य बस स्थानकांतील वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरू ठेवण्याची मागणी विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे २७ जुलैला केली आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणताही निर्णय संघाला कळविला नाही. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. थोडक्यात या मागणीलाही रा. प. महामंडळाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
या कार्यालयात कार्यरत असलेले तत्कालीन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च कमी व्हावा या उद्देशाने कणकवलीसह कुडाळ, सावंतवाडी स्थानकांतील वाहतूक नियंत्रण कक्ष रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा चुकीचा फतवा काढला होता. त्यामुळे या मध्यवर्ती असलेल्या स्थानकांतील वाहतूक नियंत्रण कक्ष रात्रो १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत बंद असतात. परिणामी रात्री १० वाजल्यानंतर स्थानकांत येणाऱ्या जाणाऱ्या एस. टी. च्या गाड्यांची नोंद होत नाही. परिणामी रात्रो उशीरा धावणार्या फेर्यांच्या बाबतीत प्रवाशांना आवश्यक माहिती मिळत नाही. दमून भागून प्रवाशी स्थानकांत झोपले तर गाडीची घोषणाच होत नसल्याने संबंधित प्रवाशांना स्थानकांत झोपण्याची नामुष्की ओढवली जात आहे. तसेच स्थानकांतून विना नोंद गाड्या रवाना होतात. पुढच्या टप्प्यात एकाद्या गाडीला अपघात घडल्यास संपर्का अभावी अडचणी निर्माण होत आहेत. या समस्या लक्षात घेऊन संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे, सचिव विलास चव्हाण यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे दि. २८ जुलैला निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी केली आहे. पण आता ३ आठवडे उलटत आले तरी विभाग नियंत्रक यांच्याकडून कोणताही सकारात्मक निर्णय कळविण्यात आलेला नाही.
आता तर गणेशोत्सवासाठी मुंबईतून सिंधुदुर्ग जिल्हात सुमारे १५०० रातराणी गाड्या येणार आहेत. मात्र वाहतूक नियंत्रण कक्ष रात्री ७ तास बंद राहत असल्याने रा. प. कर्मचार्यांसह प्रवाशांना आवश्यक माहिती अभावी मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
*चौकट*
*वाहन रोजनाम्याची नोंद न करता कोल्हापुरात कसे परतायचे?*
कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात २२ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हात जाणार्या गणेश भक्तांची मोठी गर्दी होती. त्यामुळे आगर व्यवस्थापकांनी एक शिवशाही बस कणकवलीला पाठविली. रात्री ११.३० वाजता ही बस कणकवली स्थानकात पोचली. मात्र वाहतूक नियंत्रक कक्ष १० वाजता बंद होत असल्याने बसच्या “वाहन रोजनामा” ची नोंद न करता परतीच्या प्रवासाला कसे निघायचे, हा यक्ष प्रश्न या बसच्या चालक-वाहकांना पडला. शेवटी हे दोघे वाहतूक नियंत्रण कक्षासमोर रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते