*कोंकण एक्सप्रेस*
*रविवारीपासून वेंगुर्ला बाजारपेठेत जड वाहनांना बंदी*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
गणेशोत्सव कालावधीत २४ ते ३१ ऑगस्ट कालावधीत अवजड वाहनांनी हॉस्पिटल नाका कॅम्प, बॅ.नाथ पै रोडमार्गे अशीच वाहतूक करावी. या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस स्टेशनमार्फत पोलीस व होमगार्ड यांची नियुक्ती करावी. गणेशोत्सव कालावधीत सर्वच वाहनधारक, गणेशभक्त यांसह सर्व शासकीय खात्याच्या विभाग प्रमुखांनी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केल.
वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात गणेशोत्सव नियोजन बैठक तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
दि.२५ व २६ ऑगस्टपर्यंत माटीचे साहित्य विक्री करणा-या किरकोळ व्यापा-यांना रस्त्यांच्या दुतर्फा बसविण्यात येणार आहे. या दोन दिवसाकरीता बॅ.खर्डेकर रोडवरील मारूती मंदिर ते दाभोली नाका या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात यावी. हे दोन दिवस वगळून दुचाकी वाहनांची नियमित वाहतूक, रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठेत एक दिशा मार्ग (वनवे) वाहतूक सुरू राहील. पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर या मार्गावरून चारचाकी (कार) वाहनांसाठी एक दिशा मार्ग (वन वे) वाहतूक सुरू राहील.
नागरिकांना गणेशोत्सव कालावधीतील गणपती विसर्जनस्थळी कोणत्याही स्वरूपाचा अपघात होऊ नये, यासाठी छोटी बोट तसेच लाईफ जॅकेटसह टीम मांडवीखाडी येथे तैनात करावी, अशी सूचना तहसीलदार यांनी संबंधित प्रशासनाचे अधिकारी यांना तहसीलदारांनी केली.