*कोंकण एक्सप्रेस*
*म्हापणमधील त्या अनाधिकृत व अतिक्रमीत बांधकामाची मुंबई उच्च न्यायालयाकडुन गंभीर दखल*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
म्हापण येथील रहिवासी आनंद मधुकर गावडे यांनी म्हापण बाजारपेठेत, राज्य महामार्ग १८३ लागुन केलेल्या नियमबाह्य, बेकायदेशीर, अनाधिकृत व अतिक्रमीत बांधकामाबाबत म्हापण ग्रामपंचायतीचे सदस्य गुरुनाथ गजानन मडवळ यांनी दाखल केलेल्या रिट पिटीशनची, मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतलेली असुन सरपंच, ग्रामपंचायत म्हापण तसेच संबंधित सर्व विभागात नोटीस बजावलेली आहे. संबंधित बांधकामाबाबत संबंधितांकडून कोणताही अर्ज यापुढे स्वीकारु नये, तसेच कोणताही ठराव पारीत झाला असल्यास त्यांची अंमलबजावणी करु नये तसेच आहे तशी परिस्थिती ठेवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने म्हापण ग्रामपंचायातीला दिलेले आहेत. अर्जदार गुरुनाथ मडवळ यांच्यावतीने मुंबई येथील ख्यातनाम व सुप्रसिद्ध जेष्ठ विधीतज्ञ अॅड.अभय खांडेपारकर व त्यांचे सहकारी अॅड.ऋषिकेश भगत हे काम पाहत आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आनंद मधुकर गावडे. हे म्हापण ग्रामपंचायतीचा तसेच इतर खात्याची परवानगी न घेता अनाधिकृत, बेकायदेशीर व नियमबाह्य बांधकाम करीत असून, त्याद्वारे राज्य महामार्ग १८३ ला लागुन असलेल्या म्हापण ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गटाराची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याचे गुरुनाथ मडवळ यांनी म्हापण ग्रामपंचायतीच्या निर्दशनास आणुन दिल्याने तसा ठराव एकमताने म्हापण ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत पारीत करण्यात येऊन अनधिकृत बांधकाम त्वरीत बंद करण्याचे निर्देश म्हापण ग्रामपंचायतीने आनंद गावडे यांना दिले होते. दरम्यान, याबाबत बांधकाम पाडण्याचे अधिकार असून सुद्धा म्हापण ग्रामपंचायतीने कोणतेही ठोस कारवाई न केल्याने गुरुनाथ मडवळ यांनी आगावू नोटीस देऊन उपोषण देखील केले होते. बेकायदेशीर व अनाधिकृत बांधकामाची पंचयादी करण्यात येऊन, तसेच आनंद मधुकर गावडे यांनी सदरचा गटार स्वखर्चाने सुस्थितीत करुन देण्याचे मान्य केले होते, तसेच संबंधित सर्व विभागांनी त्या अनाधिकृत व अतिक्रमीत बांधकामाविरुध्द योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश म्हापण ग्रामपंचायतीला दिले होते. मात्र, कबुल केल्याप्रमाणे गावडे यांनी गटार सुस्थितीत न केल्याने तसेच ग्रामपंचायतीने कळवूनही अनाधिकृत बांधकाम सुरुच ठेवल्याची बाब गुरुनाथ मडवळ यांनी म्हापण ग्रामपंचायतीच्या निर्देशनास आणून दिली.
आनंद मधुकर गावडे यांनी तळमजला व पहीलामजला बांधलेल्या २८ वाणिज्य गाळ्याचे व ४ निवासी गाळ्याचे मोजमापे घेऊन त्यांची स्वतंत्र करआकारणी उतारे तयार करण्याची केलेली मागणी ग्रामपंचायतीने मान्य केल्याने ग्रामपंचायतीकडुन कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई होणार नाही अशी गुरुनाथ मडवळ यांची खात्री झाल्याने त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. एकंदरीत संबंधित बांधकाम वादाच्या भोव-यात सापडले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. याबाबत सखोल कायदेशीर मार्गदर्शन अॅड. संग्राम देसाई व अॅड. किरण पराडकर यांनी केले. अशी माहिती म्हापण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य गुरुनाथ मडवळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.