*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी साईनाथ चव्हाण यांची निवड*
*मालवण (प्रतिनिधी)*
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी गेली चार दशके निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मकवाढीत श्री साईनाथ चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी श्री चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करीत एक प्रकारे सन्मान केला आहे.
मालवण वायरी येथील श्री. साईनाथ चव्हाण हे गेली चाळीस वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे कामं करत आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद, मालवण तालुका काँग्रेस अध्यक्षपद, सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद व नंतर सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद अशा महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी कामं केले आहे. राष्ट्रीय काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी गेली कित्येक वर्षे काम केल्यानंतर आता त्यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद भूषविताना श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील अनेक सत्तास्थाने काँग्रेस पक्षांकडे ठेवण्यात महत्वाचे काम केले होते.
संघटनात्मक दृष्ट्या काँग्रेस पक्षाला वेळोवेळी उभारी देण्याचे काम श्री. साईनाथ चव्हाण यांनी केले आहे. आता श्री. चव्हाण यांची काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने निश्चितपणे काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांतून व्यक्त होत असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.