*कोंकण एक्स्प्रेस*
*मालवणचे सुपुत्र प्रकाश रेडकर यांच्यासह मुंबई अग्निशमन दलाच्या सहकाऱ्यांचा रजत पदक देऊन होणार सन्मान*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवणचे सुपुत्र आणि मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क अग्निशमन केंद्राचे प्रमुख अग्निशामक श्री प्रकाश बाळकृष्ण रेडकर यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने दिले जाणारे रजत पदक जाहीर झाले आहे. भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेने हे पुरस्कार जाहीर केले आहेत
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विविध दुर्घटना स्थळी उत्कृष्ट शौर्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रजत पदक आणि प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला जातो. मालवण शहरातील गवंडीवाडा मक्रेबाग येथील मूळ रहिवासी असणाऱ्या प्रकाश बाळकृष्ण रेडकर यांनी शिवाजी पार्क अग्निशमन केंद्रात प्रमुख अग्निशामक म्हणून सेवा बजावत आहेत. श्री रेडकर हे मालवणच्या भंडारी ए सो हायस्कुलचे आणि मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी आहेत
दि २४ मार्च २०२५ रोजी मुंबई धारावी बस डेपो नजीक सायन बांद्रा लिंक रोडवर सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाला आग लागली असता ही आग शमविण्यासाठी प्रमुख अग्निशामक प्रकाश बाळकृष्ण रेडकर यांनी अत्यंत चातुर्याने आणि कर्तव्य बुद्धीने कार्य करून ही आग आटोक्यात आणली होती. या कार्याची दखल घेऊन मुंबई अग्निशमन दलाने श्री रेडकर यांना रजत पदक व प्रमाणपत्र जाहीर केले आहे
श्री रेडकर यांच्या बरोबर शिवाजी पार्क अग्निशमन केंद्राचे तत्कालीन वरिष्ठ केंद्र अधिकारी महेश अर्जुन जाधव, यंत्रचालक मनोज आबासाहेब पाटील, अग्निशामक दत्ता भिका दिघे, मयूर दत्तू चव्हाण यांनाही रजत पदक देण्यात येणार असून अग्निशामक सचिन प्रताप जाधव, ज्ञानेश्वर श्रीराम रुपनर, महिला अग्निशामक समृद्धी निवास सुतार यांनाही सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे