*कोंकण एक्स्प्रेस*
*आचरा गावाला तालुक्याचा दर्जा द्यावा*
*धोंडू चिंदरकर यांची महसूलमंत्री ना. बावनकुळे यांच्याकडे मागणी*
*मालवण : प्रतिनिधी*
आचरा गावाचे तालुक्यात रूपांतर करून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करून केली.
आचरा गाव हे परिसरातील अनेक गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे सर्व शासकीय आणि आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार आचरा गावाची लोकसंख्या ५,९०९ एवढी आहे. गावाच्या दैनंदिन व्यवहारासाठी दशक्रोशीतील रामगड, श्रावण, आडवली, पळसंब, त्रिंबक, चिंदर, हर्ड, वायंगणी, तोंडवळी, पोयरे, मुणगे, हिंदळे, मिठबाव, नारिंग्रे या गावातील लोकांची सतत ये-जा असते. या लोकांना सरकारी कामासाठी मालवण-देवगड येथे जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. आचरा गावाला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास या समस्या दूर होतील. आचरा गावात पोलीस स्टेशन, विद्युत सबस्टेशन, पोस्ट ऑफिस, मोठी बाजारपेठ, बँका, महसूल मंडळ अधिकारी कार्यालय, शासकीय धान्य गोडाऊन, शासकीय विश्रामगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र या सुविधा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, आचरा गावाला पर्यटनासाठी भव्य असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आचरा हे दशक्रोशीतील लोकांवर अवलंबून असलेले आणि विकसित गाव आहे. आचरा गावाला तालुक्याचा दर्जा देऊन त्याचे तालुक्यात रूपांतर करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मागणी पूर्ण झाल्यास, दशक्रोशीतील लोकांची मोठी सोय होईल, असे श्री. चिंदरकर यांनी नमूद केले आहे.
श्री. चिंदरकर यांनी या मागणीच्या संदर्भात शासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
आचरा दशक्रोशीतील सर्व सरपंचांचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. शिवाय यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्याशी आपण चर्चा केली आहे असे श्री. चिंदरकर यांनी सांगितले. यावेळी शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.