*कोंकण एक्सप्रेस*
*”स्वामित्व सनद देण्यासाठी जिल्ह्यातील सात ही नगरपालिकेचा “ड्रोन सर्व्हे” करणार..*
*महसुल मंत्र्यांची सावंतवाडीत घोषणा; आमदार दीपक केसरकरांच्या निवासस्थांनी भेट..*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील सात ही नगरपालिकांचा “ड्रोन सर्व्हे” करुन संबधित नागरिकांना स्वामित्व सनद देण्याबाबत शासनाचा विचार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून २ कोटीची तरतूद करण्यात यावी, अशा सुचना पालकमंत्री नितेश राणेंना आपण दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली. दरम्यान कोकण खुप सुंदर आहे. अडीच वर्षानंतर मी कुटुंबासह फिरण्यासाठी सिंधुदुर्गची निवड केली. येथे येवून खुप चांगले वाटले, असे ही त्यांनी सांगितले.
जिल्हा दौऱ्यावर असलेल्या श्री. बावनकुळे यांनी आज आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थांनी भेट दिली. यावेळी केसरकर व अन्य शिवसेना कार्यकर्त्याच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी जिल्ह्यातील परिस्थिती बद्दल माहिती देताना ते म्हणाले, या ठिकाणी सामाईक जमिनीचा प्रश्न आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. मात्र तो आत्ता सोडविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सातही नगरपालिका क्षेत्राचा ड्रोन सर्व्हे करुन त्याचा स्वामित्व सातबारा तयार करण्यात येणार आहे. त्याचा फायदा लोकांना होणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मधून २ कोटीची तरतूद करण्यात यावी, अशा सुचना मंत्री राणेंना आपण दिल्या आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बैंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नारायण राणे, सचिन वालावलकर, भारती मोरे, शर्वरी धारगळकर, सुरज परब, क्लेटस फर्नाडिस, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.