*कोंकण एक्सप्रेस*
*कासार्डे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पावसावर केली कवितांची उधळण!*
*श्रावण सरी काव्यमैफिल उत्साहात संपन्न..*
*कासार्डे प्रतिनिधी; संजय भोसले*
श्रावणमासाच्या सरींसारख्या शब्दसरींचा आनंद देणारी, रसिकांच्या मनात श्रावणाला साजेसं गारवा पसरणारी “श्रावण सरी काव्यमैफिल” कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथील शाळेच्या सभागृहात जल्लोषात पार पडली.
पावसाच्या सरींच्या साक्षीने साजरी झालेली ही ‘काव्यपुष्पांची उधळण,’ श्रावणाच्या हिरवाईत रंगत गेली.विद्यालयातील अनेक बाल कवींच्या रसाळ वाणीने रसिकांच्या मनात शब्दांचे इंद्रधनु पसरले. शब्दांनी जणू जलधारांशी स्पर्धा करत अंतःकरण भिजवले…. बाल कविंच्या नवनवीन कल्पनांनी श्रावणा सरीला विविध रंगांची उधळण करीत रंगवले आणि उपस्थितांची वाहवा! मिळवली.
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मराठी विभागातर्फे “श्रावण सरी” या विद्यार्थ्यांच्या काव्यमैफिलीचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
“श्रावण मासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरून ऊन पडे”
अशा या श्रावणातल्या पावसावर आधारित या विशेष कार्यक्रमात तब्बल 23 विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता सादर करत रसिकांची मने जिंकली.
काव्य मैफिलीचा प्रारंभ दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम- भाग्यश्री बिसुरे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लहानपणापासून लागल्यास नवलेखक व कवी कसे घडू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले.तर.पर्यवेक्षक श्री.शामसुंदर राणे यांनी बालपणी अनुभवलेला श्रावणतला पाऊस कवीमनाला कशी भूरळ घालतो याविषयी सांगितले
” हसरा नाचरा ,जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला…..”
अशा या सुंदर श्रावण महिन्याचे वर्णन करताना विद्यार्थ्यांनी श्रावणातील सृष्टी सौंदर्य, निसर्गातील बदल, आठवणी व भावना यांचा सुरेख संगम कवितांमधून मांडला. विविध छंदांमध्ये गुंफलेल्या कविता आणि बाल कल्पनेतून पाऊसाला घातलेली साद अशा या उत्कृष्ट सादरीकरणामुळे वातावरणाला साहित्यिक साज चढला होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख श्रीम- संजिवनी नागावकर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रामचंद्र राऊळ यांनी ,तर आभार श्रीम- वैष्णवी डंबे यांनी मानले.
या काव्यमैफिलीत श्री.अवधूत घुले, श्री. पांडूरंग काळे, श्री.देवरुखकर,श्री. पवार, श्री. पांचाळ,श्री.नलवडे,श्री. जमदाडे,श्री. कामठे,श्री. परब, श्री.काणकेकर यांनी आपले विचार मांडले.
श्रावणसरीनी ओथंबलेल्या या काव्यामैफिलीत जस्मिन जाधव,मानवी यादव,उर्वी पाटील, आकांक्षा आडिवरेकर,हर्षदा येंडे,तनिषा पालव,केतकी प्रभुदेसाई, साक्षी सावंत,पूजा आयरे,आदिती गुरव, मृदुला राणे,रिद्धी परब,हर्षराज पाताडे, प्रज्वल पाताडे,रोहनपवार,राधिका शिंदे,ऋतुजा कोकरे, दिव्या सावंत,दिव्या म्हस्के, स्वरा पाटील, साक्षी लाड, मधुरा तेली,मृदुला पाताडे या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन पावसावर आधारित स्वरचित कवितांचे वाचन केले. उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद दिला. या काव्य मैफिलीत अवघा विद्यार्थीगण श्रावणातील पाऊसाप्रमाणे शबदरुपी पाऊसाने न्हाऊन निघाला.