*कोंकण एक्सप्रेस*
*गवाणेच्या प्राथमिक शाळेत मोफत छत्री वाटप*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
पुर्ण प्राथमिक शाळा गवाणे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथील शाळेतील ४२ विद्यार्थी -विद्यार्थीनींना मोफत छत्री वाटप करण्याचा कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख लहू दहिफळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी जयवंत मालणकर, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश देवरुखकर, माजी सरपंच ऊमेश गवाणकर उपस्थित होते. ४१ वर्षांपूर्वी इ. ७ वीत गवाणे-नाद केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले शाळेचे माजी विद्यार्थी जयवंत मालणकर यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. मालणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणात त्यावेळची प्रतिकुल परिस्थिती कथन करताना अश्रू अनावर झाले. “छत्री विकत घेण्याइतपत आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे पावसाळ्यात शाळेत येता-जाता रेशनवरील बारदानाची खोळ करुन पावसापासून संरक्षण करत होतो, त्या परिस्थितीची जाणीव ठेवून मी आज हे छत्री वाटप करतोय याचा मला आनंद होतोय.नोकरीच्या फंदात न पडता व्यवसायिक बना मग तो कोणताही असो. वाचा, लिहा आणि देशसेवा करा” असा मौलिक संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. रक्षाबंधनचा पवित्र दिवस असल्याने शाळेतील विद्यार्थी -विद्यार्थीनींनी स्वतः राख्या बनवून अनोखे प्रदर्शन भरवले होते, त्याचे उद्घाटन मालणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विद्यार्थी म्हणून चिमुकल्या मुलींनी त्याना राख्या बांधून रक्षा बंधननाचा उत्सव साजरा केला. मुख्याध्यापिका सौ. शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता यशस्वी झाली.