*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला शहरात मोकाट फिरणा-या कुत्र्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मोठ्याने भुंकणे, रडणे, पादचारी आणि वाहनधारक यांच्या अंगावर धाऊन जाणे असे उपद्रवी प्रकार या मोकाट कुत्र्यांकडून घडत आहे. अलिकडेच मोकाट फिरणा-या कुत्र्यांनी शालेय मुलाचा चावा घेतल्याची घटना शहरात घडली आहे. शहरवासीयांना त्रासदायक ठरत असणा-या समस्येकडे वेंगुर्ला नगरपरिषदेचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी केला आहे.
मोकाट फिरणा-या कुत्र्यांवर नसबंदीसारखे उपाययोजना त्वरित राबविणे गरजेचे असताना नगरपरिषद मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा बेपर्वाई प्रशासनामुळे भविष्यात शहरामध्ये माणसांपेक्षा कुत्र्यांचीच संख्या जास्त दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मोकाट फिरणा-या कुत्र्यांकडून विष्ठेच्या स्वरूपात शहराच्या स्वच्छ सुंदरतेमध्ये बाधा आणली जात आहे. तरी याचा गांभीर्याने विचार करून श्वानांपासून शहराला भयमुक्त करावे अशी मागणी अॅड.सातार्डेकर यांनी केली आहे.