*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रक मारहाण प्रकरणी ११ एसटी कर्मचारी यांना केले निलंबित*
*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रक मारहाण प्रकरणी ११ एसटी कर्मचारी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई एसटीच्या कणकवली विभागीय कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शिस्तभंग व गैरवर्तवणुकीचा या कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात वेंगुर्ले आगारातील १० तर कुडाळ आगारातील एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळतेय.
याबाबत वेंगुर्ले आगर व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी विभागीय वाहतूक अधिक्षक सिंधुदुर्ग यांना दिलेल्या अहवालानुसार, वेंगुर्ले आगारामध्ये ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहन परीक्षक म्ह्णून कामगिरीवर असलेल्या चालकात व तीच एसटी बस दुसऱ्या फेरीसाठी घेणाऱ्या चालकात एसटी देवाण घेवाण वरून वाद झाले. यात अन्य काही कर्मचारी व त्या वाहन परीक्षक यांच्यात शिवीगाळ झाली. यानंतर आगारातील सुरक्षा रक्षक गेट वर सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या कर्मचाऱ्यांना गोळा करण्यात आले. व वाहन परीक्षक यांना गेटच्या बाहेर घेतल्याशिवाय कोणीही बस मार्गस्थ करू नये असे संघटनेमार्फत ठरवण्यात आले. यानंतर ६ ऑगस्ट रोजी दुपारी १.४५ ते रात्रीपर्यंत नियोजित फेऱ्या न गेल्याने व उशिरा धावल्याने प्रवाश्यांची गैरसोय होऊन परिवहन मंडळाची प्रतिमा मालिन झाल्याचे आगर व्यवस्थापक यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
यानंतर हे प्रकरण वाढून वाहतूक नियंत्रक यांना काही कर्मचारी यांच्याकडून मारहाण करण्यात आली. यानंतर हे प्रकरण वेंगुर्ले पोलीस स्थानकात गेले. यावेळी वाहतूक नियंत्रक यांनी तक्रार न दिल्याने हे प्रकरण मिटवण्यात आले मात्र आगार व्यवस्थापक यांनी विभागीय वाहतूक अधीक्षक सिंधुदुर्ग यांना दिलेल्या अहवालानुसार वेंगुर्ले आगार वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहन परीक्षक यांना मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी वेंगुर्ले आगारातील १० व कुडाळ आगारातील १ अशा एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्यामार्फत बाजवण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी एक समिती गठीत करून चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर नंतर प्राप्त माहिती व अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.