नरहरी सोनाराचा चलचित्र देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

नरहरी सोनाराचा चलचित्र देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

*कोंकण एक्सप्रेस*

*🛑नरहरी सोनाराचा चलचित्र देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू*

*🛑कलमठ बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा*

 *कणकवली (प्रतिनिधी):*

कलमठ बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “कथा नरहरी सोनाराची” या विषयावरील चलचित्र देखाव्याने भाविकांची मने जिंकली. ढोल-ताशांच्या गजरात साकारण्यात आलेल्या या दिंडीत महिलांस, बाल,वृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मंगळवारी सकाळी घटस्थापनेनंतर हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली. या निमित्ताने वाडीनिहाय अहोरात्र भजने, धार्मिक कार्यक्रम, व भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक उपक्रम पार पडले. मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची आकर्षक आरास करण्यात आली होती, तर संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने झगमगत होता.

रात्री बाजारपेठेतील मंडळींनी “कथा नरहरी सोनाराची” या पौराणिक कथेनुसार सुंदर आणि भावस्पर्शी चलचित्र देखावा सादर केला. महादेव भक्त नरहरी सोनार याच्या निस्सीम भक्तीचा आणि त्याच्या विठ्ठल दर्शनाच्या प्रसंगाचा सुरेख अभिनयाद्वारे सादरीकरण करण्यात आले. नरहरीची भूमिका स्वरांश रेवडंकर याने, शिवशंकराची आराध्य कांबळी याने, तर विठ्ठलाची भूमिका अद्वैत पेडणेकर याने साकारली. यासोबत गौरांक सावंत, त्रिशा सावंत, स्वर कांचवडे, स्वयम गावडे यांनी वारकरी यांच्या भूमिकेतून देखावा सजवला.

कलमठ माणिक चौक ते मंदिरापर्यंत काढलेल्या दिंडीत भक्तांनी गोल रिंगण करून अभंग गात विठ्ठलनामाचा जयघोष केला. या देखाव्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले. मंदिर परिसरात जमलेल्या भाविकांनी देखाव्याचा आनंद घेत मोबाईलमध्ये क्षण कैद केले.

या देखाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकुमार हजारे, प्रविण चिंदरकर, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, धीरज मेस्त्री, अनिकेत कांबळी, आबा मेस्त्री, मंथन हजारे, नील लोकरे, हर्ष हजारे तसेच श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीचे मोलाचे योगदान लाभले.

बुधवारी सकाळी विठ्ठल-रखुमाईची पालखी मिरवणूक भक्तांच्या उपस्थितीत पार पडली. यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हरिनाम सप्ताहाने कलमठ बाजारपेठ भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!