*कोंकण एक्सप्रेस*
*शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारीकडे विभागून नेण्याचा प्रयत्न- आ.दीपक केसरकर *
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यातील अम्युझमेंट पार्क जाहीर झालेल्या तिलारीसह मळगाव आणि रेडी पर्यंतचा विकास होण्यासाठी कोकणाकडे येणारा शक्तीपीठ महामार्ग दोन्ही ठिकाणी विभागून जावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी फेर आदेश दिले आहेत. याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास निश्चित त्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला होईल. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान जिल्ह्यात कधी नाही ती आता चांगली राजकीय परिस्थिती आहे. खासदार, पालकमंत्री, आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र राहावेत त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणाऱ्या किंवा वाद निर्माण होणार नाहीत. कोणतेही स्टेटमेंट येणार नाहीत, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
विदेश दौऱ्यावर गेलेल्या श्री. केसरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपण नुकताच इंडोनेशिया आणि सिंगापूर येथे पर्यटनाच्या दृष्टीने दौरा केला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन विस्तारलेले आहे. साचे हॉटेल पाचशे रूमचे आहे तर सर्वात जास्त हॉटेल ही सात हजार रूपयाची आहे. त्या देशांप्रमाणे या ठिकाणी पर्यटन व्हावे, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने तिलारी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अम्युझमेंट पार्क व्हावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या पार्श्वभूमीवर, वारंवार निविदा मागवण्यात आल्या परंतु दुर्दैवाने अद्याप पर्यंत कोणी उद्योजक त्या ठिकाणी आलेले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात शक्तीपीठ महामार्ग हा तिलारीच्या दिशेने गेल्यास त्याचा फायदा नक्कीच पर्यटनाला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, हा महामार्ग मळगावसह तिलारीकडे विभागून नेता येऊ शकतो का? या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या महामार्गाचे पुन्हा अलाइनमेंट करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. सकारात्मक निर्णय झाल्यास निश्चितच त्याचा फायदा येथील जनतेला आणि विशेषता पर्यटनाला होणार आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दाखल झाल्यामुळे रोजगाराच्या दृष्टीने त्याचा स्थानिकांना फायदा होणार आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
गुंतवणूकदारांनी या ठिकाणी यावे आणि तिलारीच्या विकासात योगदान द्यावे, अशी आम्ही वारंवार विनंती करत आहोत. त्या दृष्टीने आम्ही निविदा काढल्या होत्या, परंतु अद्याप पर्यंत कोणाचाही प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी गेल्यानंतर निश्चित त्याला चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल. तरीही आगामी काळात तिलारी मध्ये होणारे पर्यटन लक्षात घेता त्या ठिकाणी जाणारा रोड हा काँक्रीटचा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या महायुतीतील अंतर्गत कुरघोडी बाबत श्री. केसरकर यांना छेडले असता या वादानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. परंतु अनेक वर्षांनी का होईना या ठिकाणी सकारात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. खासदार, पालकमंत्री, आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे सर्वजण एकत्र राहिल्यास त्याचा फायदा निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत होणार आहे. परंतु कोणाच्या वक्तव्याने कार्यकर्ते दुखावले जाणार नाही यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारची कोणती वादग्रस्त स्टेटमेंट येणार नाहीत, अशा कार्यकत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असे श्री. केसरकर म्हणाले.