*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल*
*सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार*
*सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार*
*नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे वाढविणार*
*कोकण रेल्वे प्रवासी समिती च्या भेटीत मंत्री नितेश राणे यांची समस्यांवर सविस्तर चर्चा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे याची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
ओम गणेश निवास, कणकवली येथे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राणे म्हणाले, “आपल्या सर्व मागण्यांवर रेल्वेमंत्र्यांसमवेत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. यापुढे दर तीन महिन्यांनी मी आणि प्रवासी संघटना मिळून संयुक्त बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करू.” असे सांगितले.
यावेळी गणपती सणासाठी विशेष गाड्या
२५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत मडूरे–दादर व सावंतवाडी–सीएसटीएम या दोन नव्या गाड्या तात्काळ सुरू कराव्यात. पुढे प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या कायमस्वरूपी सुरू ठेवाव्यात. मडूरे–रत्नागिरी दरम्यान लोकल पॅसेंजर गाडी (सावंतवाडी–मंडगाव धर्तीवर) तात्काळ सुरू करावी.रेल्वे स्थानकांवरील सुविधा संदर्भात सिंधुदुर्ग, वैभववाडी आणि नांदगाव रेल्वे स्थानकांवर पीआरएस सेवा तातडीने सुरू करावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १० रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना आवश्यक त्या सेवा-सुविधा मिळाव्यात.सध्या कोकण मार्गावर धावणाऱ्या ७५ पैकी १६ जलदगाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबत नाहीत. या गाड्यांना थांबे देण्यात यावेत, यासाठी मागणी करण्यात आली आहे.सावंतवाडी स्टेशनला “सावंतवाडी टर्मिनल” असे नाव देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा.कसाल रेल्वे स्थानक सुरु करणे आणि गेल्या २५ वर्षांपासून मंजूर असलेले कसाल स्थानक तातडीने सुरू करावे.अॅप्रोच रोडची दुरुस्ती, पीओबी (प्लाय ओव्हर) बांधणे, सीसीटीव्ही, डिजिटल बोर्ड, प्लॅटफॉर्म शेड, पाणपोई, स्वच्छतागृह, ड्रेनेज व्यवस्था, पार्किंग यांसारख्या सुविधा तत्काळ पुरवाव्यात. अशा अनेक मागण्या केल्या.
यावेळी शिष्टमंडळात प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर, समन्वयक नंदन वेगुर्लेकर, अजय मयेकर, संतोष राणे, सुरेश सावंत, निता राणे, जयेंद्र परब, बाळा सातार्डेकर, संजय वालावलकर, किशोर जैतापकर, तेजस आंबेकर, महेश रावराणे, रमेश जामसांडेकर आदी उपस्थित होते.