कर्ले महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

कर्ले महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कर्ले महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न*

*करिअर कट्टा विभागाचा उपक्रम*

*शिरगांव : संतोष साळसकर*

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलीत देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयात ३० जुलै रोजी आर्थिक साक्षरता कार्यशाळा पार पडली.
विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस सेबीच्या ट्रेनर सीमा बाजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांचे परिपूर्ण ज्ञान मिळाल्यास भविष्यात ते आर्थिकदृष्टया सज्ञान होऊन स्वावलंबी बनतील. त्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही असे सांगून विविध क्षेत्रातील आर्थिक गुंतवणूक त्यातील फायदे-तोटे याविषयी विविध उदाहरणांच्या माध्यमातून सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांना डिजिटल व्यवहाराची माहिती असावी व त्यांच्या उद्याच्या आर्थिक निर्णयामध्ये सजगता यावी यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेत विद्यार्थ्यानी आर्थिक साक्षरतेसंबधी विविध प्रश्न विचारले त्यांचे चर्चेव्दारे शंकानिसरण करण्यात आले. कार्यशाळेत कला आणि वाणिज्य शाखेतील ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, करीअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका अक्षता मोंडकर, सहाय्यक कोमल पाटील, प्राध्यापक आशय सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!