*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच्या एकदिवशीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
शिक्षण विकास मंडळ, देवगड संचलित श्री. स. ह. केळकर वरिष्ठ महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभाग आणि अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार या वर्षी पासून बदललेल्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या अर्थशास्त्र या विषयाची एकदिवसीय कार्यशाळा देवगड महाविद्यालयामधील ग्रंथालय सभागृहात २६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सहकार्यवाह विश्वमित्र खडपकर यांनी दीपप्रज्वलन करून केली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद शेटे, मुंबई विद्यापीठ, अर्थशास्त्र विभाग अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. बालाजी सुरवसे, डॉ.अरुण जाधव, डॉ. लोखंडे, डॉ.चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जागतिक किर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुंबई विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ.बालाजी सुरवसे यांनी अभिवादन केले.
या प्रसंगी अभ्यासमंडळाचे सदस्य यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार कुनुरे आणि उपप्राचार्य प्रा.श्रीकांत सिरसाठे यांनी केले. संस्थेचे सहकार्यवाह विश्वामित्र खडपकर यांनी या कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते.
डॉ.अरुण जाधव यांनी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना द्वितीय वर्ष कला शाखेचाअर्थशास्त्र विषय निवड करण्यासंदर्भात आणि बदललेल्या अभ्यासक्रमांदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा.प्रल्हाद कांबळे यांनी केले. या कार्यशाळेसाठी उपस्थित मान्यवर अतिथी, प्राध्यापक , विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार प्रा. प्रशांत राऊत यांनी मानले.