*कोंकण एक्सप्रेस*
*श्री.क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला कोणतीही हानी न होता रेवस-रेड्डी कोस्टल प्रकल्प राबविण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश*
*मुंबई, दि.२३ जुलै २०२५ :*
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत MSRDC कडून चौथऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने आज मुंबईतील निर्मल भवन येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) कार्यालयात मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
रेवस-रेड्डी कोस्टल हायवे अंतर्गत MSRDC कडून देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील रस्त्याचे पुनर्वसन आणि अपग्रेडेशन करण्यात येत आहे. याअंतर्गत कुणकेश्वर मंदिर परिसरात चौथऱ्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी आज मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी बोलतांना मंत्री नितेश राणे म्हणाले कि, ‘श्री.क्षेत्र कुणकेश्वर हे कोकणवासीयांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे मंदिराला कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊन प्रकल्प पूर्ण करा’ असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस MITRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रवीण परदेशी, महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे संचालक श्री.अभय पिंपरकर, MITRA चे वरिष्ठ सल्लागार श्री.निखिल नानगुडे, संदीप साटम उपस्थित होते.