*कोंकण एक्सप्रेस*
*खेळातून करिअर करतील असे खेळाडू घडवावेत – जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. निलिमा अडसूळ*
*कासार्डे येथे आयोजित कणकवली, वैभववाडी व देवगड तालुक्यातील क्रीडा शिक्षक सभेत प्रतिपादन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
खेळ आणि खेळाडूंना पुरक ठरणारी शासकीय योजनांची माहिती क्रीडा शिक्षकांनी शाळा आणि संस्थेपर्यंत पोहचवावी, आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानमुळे गतिमान होत चाललेल्या युगामध्ये आजची पिढी सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून क्रीडा शिक्षकांनी खेळात करिअर करीत असे खेळाडू घडवावेत असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. निलिमा अडसूळ यांनी कासार्डे येथे केले.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा कणकवली,देवगड आणि वैभववाडी तालुका सभेचे आयोजन कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे करण्यात आले
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्या क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर कणकवली तालुका क्रीडाधिकारी राहुल गायकवाड वैभववाडी व देवगड तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे, क्रीडा अधिकारी शितल शिंदे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष बयाजी बुराण, विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी. बिसुरे, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.व्ही. राणे,क्रीडा मार्गदर्शक श्रीम.माधुरी घराळ, विस्ताराधिकारी कणकवली कैलास राऊत,देवगड तालुका विस्ताराधिकारी श्री.दहिफळे, कणकवली तालुका समन्वयक दत्तात्रय मारकड,देवगड तालुका समन्वयक उत्तरेश्वर लाड, वैभववाडी तालुका समन्वयक रामचंद्र घावरे,मुख्याध्यापक प्रतिनिधी बाळासाहेब ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांचे हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करुन सभेची सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील खेळाडूत सर्वाधिक टॅलेन्ट..
त्या पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खुप मोठे टॅलेन्ट आहे.त्याला योग्य मार्गदर्शकांची आणि आधुनिक साहित्याची जोड देणे गरजेचे आहे.सांगली ,सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील खेळाडूंबरोबरीने तुल्यबळ असा खेळ करतील असे खेळाडू आपणही तयार करायला हवेत. कोकणातील भौगोलिक परिस्थितीवर आणि वातावरणावर मात करून आपणास असे गुणवंत खेळाडू घडवावे लागणार आहेत, त्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय असे स्पष्ट मत व्यक्त करून,इतर जिल्ह्यांच्या तूलनेने सिंधुदुर्गातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रामाणिक आणि खिलाडीवृत्तीचे असल्याचे सांगत विशेष कौतुक केले.
याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.बी.बी. बिसुरे यांनी सर्व मान्यवरांचे तसेच तीन तालुक्यातून आलेल्या क्रीडा शिक्षकांचे स्वागत करून शालेय क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे म्हणाले की,शिस्त हाच प्रत्येक खेळाचा पाया असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद करून शैक्षणिक वर्षातील सर्व स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बयाजी बुराण यांनीही मनोगत व्यक्त केले.
कासार्डेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांची कणकवली तालुका समन्वयकपदी नेमणूक
कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाची,अनुभवाची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.निलीमा अडसूळ यांनी कणकवली तालुका समन्वयकपदी नियुक्ती केल्याचे पत्र देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
तालुका क्रीडा अधिकारी यांचे विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन:-
या सभेतील दुसऱ्या सत्रात वैभववाडी,देवगड तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे यांनी -‘क्रीडांगण विकास अनुदान,क्रीडा सुविधा निर्मिती अनुदान या विषयावर ,
कणकवली तालुका क्रीडा अधिकारी राहूल गायकवाड यांनी व्यायामशाळा विकास अनुदान याविषयावर , क्रीडा अधिकारी श्रीम.शितल शिंदे यांनी ‘ग्रेस गुण, प्रोत्साहनात्मक अनुदान या विषयावर तर क्रीडा मार्गदर्शक श्रीम-माधूरी घराळ यांनी लक्ष्यवेध योजना, क्रीडा प्रशिक्षण केंद्र माहिती या विषयावर सभेत सविस्तर माहिती दिली.
दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा अधिकारी तसेच क्रीडा मार्गदर्शक तसेच इतर मान्यवरांचा कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व तालुक्याच्यावतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर यावेळी राष्ट्रीय कबड्डीपट्टु भुपेश राणे यांचाही सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
दुस-या सत्रातील चर्चासत्र…..-
दुस-या सत्रात उपस्थित क्रीडा शिक्षकामधून उपस्थित शंकांचे निरसन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम.निलीमा अडसूळ यांनी केले.आयत्या वेळेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शिक्षकांच्या शंकांचे समाधान केले.
सभेचे ओघवत्या शब्दात सुत्रसंचलन कासार्डे ज्यु.कॉलेजचे प्रा.रामचंद्र राऊळ यांनी केले तर आभार कणकवली तालुका समन्वयक दत्तात्रय मारकड यांनी मानले.